रिलायन्स इंडस्ट्रीजने रचला इतिहास

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 10 d ago
रिलायन्स इंडस्ट्रीज
रिलायन्स इंडस्ट्रीज

 

आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी खाजगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा सुमारे 2 टक्क्यांनी घसरून 18,951 कोटी रुपयांवर आला आहे. यापूर्वी, कंपनीचा नफा 19,299 कोटी रुपये होता.

चौथ्या तिमाहीत, रिलायन्सचा ऑपरेशन्समधील महसूल 11 टक्क्यांनी वाढून 2.4 लाख कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 2.16 लाख कोटी रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीजनेही शेअरधारकांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

करपूर्व नफा 1 लाख कोटींच्या पुढे
स्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की संपूर्ण आर्थिक वर्षासाठी कंपनीचा एकत्रित महसूल 2.6 टक्क्यांनी वाढून 1 लाख कोटी होता. कंपनीने सांगितले की, संपूर्ण आर्थिक वर्षातील करपूर्व नफा 1 लाख कोटींच्या पुढे गेला आहे आणि तो 1,04,727 कोटी आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 11.4 टक्के अधिक आहे.

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, कि "रिलायन्स समूहातील विविध विभागांनी चांगली कामगिरी केली असून, पहिली भारतीय कंपनी ठरली आहे, जिने करपूर्व नफ्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे."

कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये थोडी वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 19 रुपयांच्या किंचित वाढीसह 2960.60 रुपयांवर बंद झाले. सोमवारी कंपनीचे शेअर्स 2,950 रुपयांवर उघडले.

ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर्स 2964.30 रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, चालू वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप पुन्हा एकदा 20 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.