उत्तर आणि मध्य महाराष्ट्रावर पावसाचे सावट, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. या वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असू शकतो, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या सतर्कतेच्या सूचनेनुसार, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमधील नागरिकांना पुढील काही तास सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्यास सांगितले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली किंवा जुन्या, धोकादायक इमारतींच्या जवळ आश्रय घेणे टाळावे. तसेच, विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या जागेत थांबणे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची आणि जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर संबंधित जिल्ह्यांमधील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.