आखाती तणावादरम्यान भारतासाठी एलपीजी घेऊन येणारे जहाज विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

 भारतासाठी लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) घेऊन येणारे एक जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडले असून ते आता देशाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही एक दिलासादायक घडामोड आहे.

४६ हजार टनांहून अधिक एलपीजी

'एमटी सर्व शक्ती' (MT Sarv Shakti) या मार्शल्स आयलंडचा ध्वज असलेल्या जहाजावर ४६,३१३ टन एलपीजी आहे. या जहाजावरील २० कर्मचाऱ्यांपैकी १८ कर्मचारी भारतीय आहेत. या टँकरने २ मे रोजी हा महत्त्वाचा सागरी मार्ग ओलांडला असून ते १३ मे रोजी विशाखापट्टणम येथे पोहोचण्याची शक्यता आहे. हे जहाज इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) भाड्याने घेतले आहे.

या जहाजावरील एलपीजी साठा देशाची अर्ध्या दिवसाची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे. इराणशी संबंधित जहाजांवर अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर आणि होर्मुझमधून होणारी वाहतूक जवळपास शून्यावर आल्यानंतर, या युद्धक्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर पडणारे हे पहिलेच भारत-संबंधित जहाज आहे.

१४ भारतीय जहाजे अद्याप अडकलेली

सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला भारताचा ध्वज असलेली किंवा भारताच्या मालकीची तब्बल १४ जहाजे अडकलेली आहेत. गेल्या २४ तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांबाबत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय हे परराष्ट्र मंत्रालय, भारतीय दूतावास आणि सागरी भागधारकांशी समन्वय साधून कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करत आहे.

नौवहन महासंचालनालयाच्या (DG Shipping) नियंत्रण कक्षाने आतापर्यंत ८,३७३ कॉल्स आणि १७,९६५ हून अधिक ईमेल्स हाताळले आहेत. तसेच, भारताने आतापर्यंत आखाती देशांतून २,९५३ हून अधिक खलाशांना मायदेशी सुखरूप परत आणले आहे. देशभरातील सर्व बंदरांवरील कामकाज सध्या सुरळीत सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.