नवी दिल्ली
गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत असलेल्या बांगलादेशने अतिरिक्त इंधन पुरवठा करण्यासाठी भारताकडे केलेली विनंती सध्या विचाराधीन असल्याचे भारताने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बांगलादेशच्या या अर्जावर तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींची तपासणी केली जात आहे.
बांगलादेशमध्ये सध्या तीव्र ऊर्जा व वीज संकट निर्माण झाले असून, सुरळीत पुरवठ्यासाठी त्यांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. भारत आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत कायम सहकार्याचे धोरण राबवत असून, या विनंतीवर सर्व बाजू तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे संकेत परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्याचा भाग म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.