गॅस सिलेंडरच्या टंचाईमागील खरं कारण आणि भविष्यातील बायोगॅसचा पर्याय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पल्लव भट्टाचार्य 

इतिहासात असे काही प्रसंग येतात जेव्हा एखादी सामान्य वस्तू संपूर्ण देशाची नाजूक स्थिती उघड करते. भारतात गॅस सिलेंडर हा आपल्या रोजच्या जगण्याचा इतका मोठा भाग आहे की आपण त्याकडे सहसा लक्ष देत नाही. पण गेल्या काही आठवड्यांत हेच सिलेंडर काळजी, लांबच लांब रांगा आणि अनिश्चिततेचे कारण बनले आहे. ही केवळ तात्पुरती अडचण नसून जग एकमेकांवर किती अवलंबून आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. दूरवर चालणाऱ्या युद्धाची झळ आज आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे.

या चिंतेची मुळे भारताच्या सीमांच्या पलीकडे हॉर्मुझची सामुद्रधुनी या अरुंद समुद्री मार्गात आहेत. जगातील एकूण तेल आणि गॅसचा पाचवा हिस्सा याच मार्गातून जातो. पश्चिम आशियातील युद्धामुळे हा मार्ग जणू बंद झाला असून त्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. तेलाच्या किमती खूप वाढल्या, गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आणि जागतिक पुरवठा साखळी कोलमडू लागली.

भारतासाठी हा धक्का खूप मोठा होता. आपण कच्च्या तेलासाठी आणि गॅससाठी आयातीवर अवलंबून आहोत. आपला बहुतांश पुरवठा याच समुद्री मार्गातून येतो. सिलेंडर मिळण्यास होणारा उशीर आणि वाढलेल्या किमतींमुळे सामान्य नागरिक आणि लहान हॉटेल चालक खूप अडचणीत आले आहेत.

विशेष म्हणजे हे संकट गॅसच्या कमतरतेमुळे नाही, तर भीती आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे निर्माण झाले आहे. सरकारकडे गॅसचा पुरेसा साठा आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि पर्यायी मार्ग शोधणे यासारखे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. यामुळे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाण्यापासून रोखली गेली असली तरी, लोकांच्या मनात असलेली भीती आणि साठेबाजीमुळे चिंता अजूनही कायम आहे.

हे संकट केवळ तांत्रिक नसून ते मानवी स्वभावाशी जोडलेले आहे. गॅस मिळण्यास थोडा उशीर झाला तरी लोकांना सर्व काही संपल्यासारखे वाटते. अफवांमुळे गर्दी वाढते आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते. अशा वेळी लोकांचा संयम हीच खरी शक्ती असते.

परंतु या संकटाकडे केवळ अडचण म्हणून न पाहता त्यातील गांभीर्य समजून घेणे आवश्यक आहे. आपण अशा जगाचा भाग आहोत जिथे आपली ऊर्जा सुरक्षा युद्धांच्या आणि संघर्षांच्या सावटाखाली असते. १९७० पासून आजपर्यंत आपण हेच पाहत आहोत.

आचार्य प्रशांत यांच्यासारख्या विचारवंतांच्या मते अशा संकटांची मुळे आपल्या स्वभावात आहेत. आपली जगण्याची पद्धत, सततची अधिकची हाव आणि प्रगतीच्या चुकीच्या व्याख्या यामुळे ही परिस्थिती ओढवते. आपली जीवनशैली इतकी परावलंबी का आहे, यावर विचार करण्याची वेळ आली आहे.

यावर दोन प्रकारचे उपाय आहेत. पहिला म्हणजे आपण प्रत्येकाने गॅसचा वापर जपून केला पाहिजे. अन्नाची नासाडी टाळणे आणि कार्यक्षम वापर करणे हे छोटे बदल मोठे परिणाम घडवू शकतात. दुसरा उपाय म्हणजे पर्यायी व्यवस्था उभी करणे.

यामध्ये बायोगॅस हा एक उत्तम मार्ग आहे. शेण आणि शेतीतील कचऱ्यापासून बनणारा हा गॅस भारतासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे कचऱ्यातून ऊर्जा मिळेल आणि आपण परदेशावर अवलंबून राहणार नाही. आपल्याकडे पशुधन आणि शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बायोगॅस निर्मितीची मोठी संधी आहे.

त्याचप्रमाणे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. ही ऊर्जा कोणत्याही युद्धावर अवलंबून नसते. हे मार्ग आपल्याला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनवू शकतात.

एलपीजी संकट आपल्याला परावलंबित्वाकडून स्वयंपूर्णतेकडे जाण्याचा इशारा देत आहे. ही केवळ गॅस बदलण्याची गोष्ट नसून आपली विचारसरणी बदलण्याची वेळ आहे. रांगा कमी झाल्या तरी आपण हा धडा विसरता कामा नये. ज्याप्रमाणे कोविड संकटाने आपल्याला डिजिटल जगाची ओळख करून दिली, त्याचप्रमाणे हे गॅस संकट आपल्याला भविष्यासाठी तयार करत आहे.

गॅसच्या त्या निळ्या ज्योतीमध्ये एक मोठी शिकवण दडलेली आहे. आपण जुन्या सवयींमध्ये अडकून राहायचे की जागरूक जीवन जगायचे, हे आता आपणच ठरवायचे आहे.

(लेखक आसाम पोलीस दलाचे माजी पोलीस महासंचालक आहेत)
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -
Awaz Marathi WhatsApp Group 

Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter