अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणला मदत करण्यासाठी भारतीय चिमुकल्यांनी आपला गल्ला फोडून पैसे जमा केले आहेत. मुलांच्या या कृतीने इराण भारावून गेला असून या मदतीबद्दल भारतीय जनतेचे आभार मानले आहेत. आभार मानताना त्यांनी देणगीदारांचा त्यांनी विशेष शब्दांमध्ये उल्लेख केला आहे.
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लेह, लडाखमधील नागरिक इराणमधील रहिवाशांच्या मदतीसाठी पैसे, मौल्यवान धातू, दागिने आणि इतर वस्तूंचे योगदान देत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, एका चिमुकलीनेही मदतकार्यात आपला वाटा उचलण्यासाठी स्वतःचा गल्ला फोडला.
लडाखचे रहिवासी गेल्या ३० दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षात अमेरिका-इस्रायली हल्ल्यांमुळे बाधित झालेल्या इराणी नागरिकांच्या मदतीसाठी नियमितपणे देणगी मोहिमा राबवत आहेत. दान केलेल्या वस्तूंमध्ये मुलांच्या अनेक सायकली देखील पाहायला मिळत असून त्या इराणसोबतच्या एकजुटीचा खंबीर संदेश देत आहेत.
गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या चंदरकोटमधील इमामबाड्यात शिया समुदायाचे शेकडो लोक इराणमधील युद्धाने प्रभावित झालेल्यांना आर्थिक आणि भौतिक मदत देण्यासाठी एकत्र आले होते. या सामुदायिक देणगी मोहिमेत स्थानिक लोकांनी घरातील भांड्यांपासून ते मौल्यवान दागिन्यांपर्यंत सर्व काही दान केले.
रामबन जिल्ह्यातील चंदरकोट परिसरातील शिया धर्मीयांनी युद्धग्रस्त इराणच्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या देणग्या दिल्या आहेत. शिया समुदायातील लोकांनी पैसे, भांडी, सोने-चांदी दान केले तर मुलांनी त्यांचे गल्ले दिले आहेत. महिलांनी अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने दिले. त्यांनी आपल्या मुलांच्या हातातील बांगड्या आणि कानातील डुलही काढून इराणच्या लोकांसाठी दान केले. एका व्यक्तीने तर आपली मेंढीदेखील दान केली. याशिवाय, बडगाममधील स्थानिकांनीही पश्चिम आशियातील संकटानंतर इराणला पाठिंबा देण्यासाठी सोने, चांदी आणि रोख रक्कम दिली आहे.
या प्रयत्नांची दखल घेत भारतातील इराणी दूतावासाने २२ मार्च रोजी इराणच्या उभारणीसाठी पैसे आणि दागिने दान करणाऱ्या भारतीयांच्या दयाळूपणा आणि माणुसकीबद्दल आभार मानले आहेत. भारताचा हा दयाळूपणा कायम स्मरणात राहील, असे दूतावासाने म्हटले आहे. दूतावासाने आपल्या संदेशात म्हटले की, "आम्ही तुमचा दयाळूपणा आणि माणुसकी कधीही विसरणार नाही. धन्यवाद इंडिया."
दूतावासाने पुढे नमूद केले की, "मानवतावादी पाठिंबा आणि मनापासून एकता दर्शवून इराणच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या काश्मीरमधील प्रेमळ लोकांचे आम्ही कृतज्ञतेने आभार मानतो. हा दयाळूपणा कधीही विसरता येणार नाही. धन्यवाद इंडिया."
पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मदत पाठवली जात आहे.