संरक्षणप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी शनिवारी सांगितले, भारताच्या ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्ध असहिष्णुतेची नवीन रेषा आखली. शत्रूंनाही या सैन्य कारवाईने धडा मिळाला असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सिंगापूरमधील शांग्री-ला संवाद परिषदेत भारत-पाकिस्तान संबंधांतील धोरणात्मक स्थैर्य आणि ऑपरेशन सिंदूरबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. “टाळी वाजण्यासाठी दोन हात लागतात, त्यांनीही हे समजून घ्यावे,” असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी सुरू झाले. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात २६ जण ठार झाले. पाकिस्तानच्या प्रत्युत्तर कारवायांविरुद्ध सर्व कारवाया या ऑपरेशन अंतर्गत झाल्या.
या चारदिवसीय सैन्य संघर्षाने दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांना मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आणले.
संघर्षातून मिळालेल्या धड्यांबाबत जनरल चौहान म्हणाले, भारताने स्वदेशी यंत्रणा आणि इतर देशांतील उपकरणे वापरली. “आम्ही ३०० किलोमीटर खोलवर पाकिस्तानातील हवाई संरक्षण भेदले. हवाई तळ आणि पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले केले. यातून उपकरणांची कार्यक्षमता दिसली,” असे ते म्हणाले.
शांग्री-ला संवाद परिषदेत ‘भविष्यातील आव्हानांसाठी संरक्षण नवोपक्रम उपाय’ या चर्चासत्रात जनरल चौहान यांच्यासह अनेक देशांचे संरक्षणप्रमुख किंवा प्रतिनिधींनी भाषणे केली. ही परिषद आशियातील महत्त्वाची सुरक्षा परिषद आहे.