संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने उघड केला पाकिस्तानचा खोटारडेपणा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
हरीश पर्वतनेनी
हरीश पर्वतनेनी

 

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानने स्वतःच्या देशातील दहशतवादी गटांना 'फितना अल-हिंदुस्तान' असे नाव देण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे धार्मिकतेचा बुरखा पांघरून पसरवलेली 'राज्य पुरस्कृत चुकीची माहिती' (Misinformation) असल्याचे भारताने ठणकावून सांगितले आहे.

पाकिस्तानची 'द्वेष पसरवणारी फॅक्टरी'

अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवर आयोजित सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरूपी प्रतिनिधी हरीश पर्वतानेनी यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला. गेल्या वर्षी पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या सर्व दहशतवादी गटांना 'फितना अल-हिंदुस्तान' असे घोषित केले होते. या गटांना भारताची फूस असल्याचा कोणताही पुरावा नसताना पाकिस्तानने हा आरोप केला होता. पर्वतानेनी म्हणाले की, "पाकिस्तानी 'डीप स्टेट'कडून चालवल्या जाणाऱ्या द्वेषाच्या फॅक्टरीचा हा परिणाम आहे. देशातील नागरिकांच्या मनात भारताबद्दल कायमस्वरूपी शत्रुत्वाची भावना निर्माण करून सत्तेवर आपली पकड घट्ट ठेवण्याचा हा डाव आहे."

लष्कराचा 'डी-फॅक्टो' उठाव आणि अफगाणिस्तानवरील हल्ले

२७ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या लष्कराने केलेला हा एक प्रकारचा अघोषित उठाव (De facto coup) असल्याचे पर्वतानेनी यांनी नमूद केले. या घटनादुरुस्तीद्वारे 'चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस' (CDF) हे पद निर्माण करून फील्ड मार्शल असीम मुनीर यांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच भारताने पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांचाही तीव्र निषेध केला. या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे भारताने निदर्शनास आणून दिले.

"लष्करी कारवाईच्या नावाखाली होणारे हे हत्याकांड खपवून घेतले जाणार नाही. निष्पाप नागरिकांना ठार मारणे किंवा मुलांना अनाथ करणे, याला दहशतवादविरोधी कारवाई म्हणता येणार नाही," असे पर्वतानेनी यांनी स्पष्ट केले. पवित्र रमजान महिन्यात आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आणि इस्लामिक एकजुटीच्या गप्पा मारत दुसरीकडे निर्दयीपणे हवाई हल्ले करणे, हा पाकिस्तानच्या दुटप्पीपणाचा उत्तम नमुना आहे. स्वतःच्या अपयशाचे खापर शेजाऱ्यांवर फोडण्याची पाकिस्तानची जुनी सवय असून जगाची दिशाभूल करण्याचा त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही, असेही भारताने शेवटी बजावले.