राजीव नारायण
भारत १५ ऑगस्ट २०२६ रोजी आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करतोय. १९४७ पासून आपण खूप मोठा पल्ला गाठलाय. पण प्रगती म्हणजे केवळ लष्करी ताकद, पायाभूत सुविधा किंवा आर्थिक विकास नाहीये. आपण निर्माण करत असलेलं जीवनाचं मूल्य, आपण जपत असलेले विचार आणि आपण घडवत असलेला समाज यावरून खरी प्रगती ठरते. या महत्त्वाच्या टप्प्यावर कठीण आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. आपण खरोखरच अपेक्षित असलेला भारत घडवतोय का?
भारताने खूप मोठी प्रगती केलीय, हे कुणीही नाकारू शकत नाही. आपली अर्थव्यवस्था खूप मोठी झालीय, पायाभूत सुविधांचं जाळं विणलं गेलंय आणि तांत्रिक क्षमताही वाढलीय. तसंच जगात भारताचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक बुलंद झालाय. वाढ महत्त्वाची असली, तरी वाढ आणि विकास या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रीय ताकद महत्त्वाची असली, तरी राष्ट्रीय ताकद आणि देशाचं कल्याण या दोन्ही गोष्टी समान नाहीत. यातला हा फरक समजून घेणं आवश्यक आहे.
एखादा देश वेगाने महामार्ग बांधू शकतो. त्याच वेळी तिथल्या मुलांना मिळणारं शिक्षण त्यांना भविष्यातल्या जगासाठी अपुरी तयारी देणारं असू शकतं. हा मोठा विरोधाभास आहे. देश मोठ्या प्रमाणावर कार, स्मार्टफोन आणि डिजिटल व्यवहार निर्माण करू शकतो. पण त्याच वेळी लाखो लोकांना आरोग्यसेवा, रोजगार, शुद्ध हवा किंवा स्वतःच्या राहणीमानाची चिंता सतावू शकते.
आर्थिक विकास हे मोठं इंजिन आहे. पण ते स्वतः अंतिम ध्येय असू शकत नाही. विकास शेवटी सामान्य लोकांच्या आयुष्यात स्पष्टपणे दिसला पाहिजे. निरोगी नागरिक, उत्तम शाळा, सुरक्षित रस्ते, स्वच्छ शहरं, उत्पादक रोजगार आणि वाढती सामाजिक गतिशीलता या सर्व गोष्टींमधून हा विकास दिसतो. तसंच आजच्या पेक्षा उद्या अधिक मोठ्या संधी मिळतील, हा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला पाहिजे.
राष्ट्रीय सुरक्षा केवळ लष्करी शस्त्रास्त्रांपुरती मर्यादित ठेवता येत नाही. ही शस्त्रास्त्रं आवश्यक असली, तरी ती सर्वस्व नाहीत. केवळ सैनिक, क्षेपणास्त्रं आणि विमानं देशाचं रक्षण करत नाहीत. लवचिक संस्था, निरोगी व सुशिक्षित लोकसंख्या, आर्थिक ताकद आणि सामाजिक एकोपा या गोष्टी देशाचं मोठं रक्षण करतात. या देशात आपलाही वाटा आहे, असा ठाम विश्वास नागरिकांच्या मनात असायला हवा. विचार करण्याची, नवीन निर्मिती करण्याची, मतभेद व्यक्त करण्याची आणि प्रयोग करण्याची सुरक्षितता वाटणारा समाज हीच खरी राष्ट्रीय ताकद असते.
पुढचं आव्हान
इथेच भारताचं पुढचं आव्हान अधिक कठीण होतं. जग वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, बायोटेक्नॉलॉजी, स्वच्छ ऊर्जा आणि नवीन तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश करतंय. हे तंत्रज्ञान आपल्याला समजण्यापूर्वीच उद्योगांना पूर्णपणे बदलून टाकतंय. थोडक्यात सांगायचं तर, भारताने या बदलात सहभागी होणं आणि त्याचं नेतृत्व करणं गरजेचं आहे.
पण केवळ तंत्रज्ञान भारताला तिथपर्यंत नेऊ शकणार नाही. त्यासाठी नव्या विचारांची गरज लागेल. लोकांना प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची आणि कधीतरी अपयशी होण्याची मोकळीक देणाऱ्या संस्कृतीतच विचार उत्तमरीत्या फुलतात. हा प्रवास प्रयोगशाळा किंवा स्टार्ट-अपच्या खूप आधी सुरू होतो. तो घरापासूनच सुरू होतो. एखाद्या मुलाने अवघड प्रश्न विचारल्यावर या प्रवासाची सुरुवात होते. त्यावर दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं असतं. त्यावरून भविष्याची दिशा ठरते. आपण मुलांच्या कुतूहलाला प्रोत्साहन देतोय, किंवा केवळ अचूक उत्तरं देणाऱ्यांचं कौतुक करतोय? आपण मुलांना विचार करायला शिकवतोय, किंवा केवळ पाठांतर करायला लावतोय?
हेच तत्त्व शाळा आणि विद्यापीठांमध्येही पुढे चालू राहिलं पाहिजे. उत्तम शिक्षण व्यवस्था केवळ परीक्षेत यश मिळवणारे विद्यार्थी घडवू शकत नाही. अद्याप उत्तरं न मिळालेले प्रश्न विचारण्याची क्षमता असणारी मुलं या व्यवस्थेने घडवली पाहिजेत. हे तत्त्व कामाची ठिकाणं आणि संस्थांमध्येही पोहोचलं पाहिजे. खोलीतल्या सर्वात तरुण व्यक्तीकडेही प्रभावशाली विचार असू शकतो. एखादा वेगळा विचार सर्व काही पूर्णपणे बदलून टाकू शकतो. अपयश ही लाजेची गोष्ट बनता कामा नये. प्रयोगांना प्रोत्साहन मिळत असेल, तर अपयश नक्कीच पचवता आलं पाहिजे. नवीन शोध लावू इच्छिणाऱ्या देशाने नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करणाऱ्या लोकांसाठी जागा निर्माण केली पाहिजे. यालाच खरा समावेश म्हणतात. आपले मार्ग वेगवेगळे असले, तरी सर्वांनी मिळून पुढे जाणं म्हणजेच खरा विकास होय.
समावेश आवश्यक
आणखी एक अस्वस्थ करणारं सत्य समोर आहे. जग भारताची अजिबात वाट पाहत नाहीये. इतर देश गुंतवणूक, प्रतिभा, तंत्रज्ञान, उत्पादन, वैज्ञानिक शोध आणि उद्याच्या विकासाची इंजिनं मिळवायला मोठी स्पर्धा करताहेत. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्यतेवर चर्चा करत बसलो, तरी ती थांबणार नाही. हवामान तंत्रज्ञान आपल्या सोयीनुसार वाट पाहणार नाही. जागतिक पुरवठा साखळ्या स्वतःची पुनर्रचना सतत करत राहतील. प्रभाव आणि समृद्धी मिळवायला सर्व देश सतत स्पर्धा करत राहतील.
भारतासमोरील संधी खूप मोठी आहे. पण ही संधीची छोटी खिडकी आहे. अशा खिडक्या कायमस्वरूपी उघड्या राहत नाहीत. आपल्याला कोणाचीही नक्कल करण्याची अजिबात गरज नाही. इतरांच्या यशाचे मॉडेल्स आंधळेपणाने स्वीकारणं, म्हणजे खरा विकास नाही. भारताचा स्वतःचा असा इतिहास, संस्कृती, ताकद आणि विविधता आहे. इतर ठिकाणी यशस्वी झालेल्या गोष्टींमधून शिकण्याची आपली तयारी असली पाहिजे. तसंच इथे कोणत्या गोष्टी चालत नाहीत, हे प्रामाणिकपणे मान्य करण्याचं धाडस आपल्यात असायला हवं. यासाठी महत्त्वाकांक्षेपेक्षा मौल्यवान अशा दुसऱ्या गोष्टीची गरज आहे. त्यासाठी बौद्धिक नम्रता आवश्यक आहे.
आपला स्वतःचा वाटा
भारताच्या भविष्यावर चर्चा करताना सरकारलाच मुख्य नायक बनवण्याचा मोह अनेकदा होतो. सरकारची भूमिका महत्त्वाची असते. ते धोरणं बनवतात, पायाभूत सुविधा उभारतात, सार्वजनिक सेवा देतात आणि अर्थव्यवस्था व समाज सुरळीत चालवायला योग्य परिस्थिती निर्माण करतात. पण केवळ सरकार स्वतःच्या जीवावर यशस्वी राष्ट्र कधीच उभारू शकत नाही.
म्हणूनच या स्वातंत्र्यदिनाला आपण राज्याकडून काय अपेक्षा ठेवतो, हा प्रश्न नाहीये. आपण स्वतःकडून काय अपेक्षा ठेवतो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कोणीतरी पाहत असेल तेव्हाच आपण नियमांचं पालन करतो का? आपण सार्वजनिक ठिकाणांचा खरोखरच आदर करतो का? आपल्याला न पटणारी मतं आपण शांतपणे ऐकून घेतो का? आपण मुलांना त्यांचं कुतूहल, सर्जनशीलता आणि वेगळे मार्ग निवडायला प्रोत्साहन देतो का? किंवा समाजात सर्वाधिक प्रतिष्ठा असलेल्या गोष्टींकडेच आपण त्यांना ढकलतो? पगार, घर किंवा बँक बॅलन्सच्या आकारावरूनच आपण यशाचं मोजमाप करतो का?
अशा लाखो छोट्या छोट्या निवडींमधूनच राष्ट्राचं चारित्र्य घडत असतं. विकासाची संपूर्ण परिसंस्था घरापासूनच सुरू होते. ती शाळा, महाविद्यालयं, कामाची ठिकाणं, समाज आणि संस्थांमधून प्रवास करते. शेवटी ती राष्ट्राची संस्कृती बनते.
ऐंशी आणि त्यापुढे
स्वातंत्र्याच्या ८० वर्षांकडे पाहण्याचा हा कदाचित अर्थपूर्ण मार्ग असू शकतो. १९४७ मध्ये भारताने स्वतःचं नशीब ठरवण्याचा अधिकार जिंकला. आठ दशकांनंतर आपण मौल्यवान गोष्ट निर्माण केलीय. ते नशीब घडवण्याची क्षमता आपण मिळवलीय. आपण या क्षमतेचा वापर केवळ श्रीमंत आणि अधिक शक्तिशाली व्हायला करणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. आपली समृद्धी सन्मान निर्माण करेल, तंत्रज्ञान मोठ्या संधी देईल, शिक्षण स्वतंत्र विचार करणारी मनं घडवेल आणि ताकद भीती न निर्माण करता सुरक्षा देईल, असा समाज आपण घडवणार आहोत का?
भारतात महत्त्वाकांक्षेची अजिबात कमतरता नाही. प्रगतीचा खरा अर्थ काय आहे, याबद्दल आपण अधिक महत्त्वाकांक्षी असणं गरजेचं आहे. भारताचा पुढचा विजय एखादा महामार्ग, मोठी अर्थव्यवस्था किंवा प्रगत मशीन नसू शकतो. तो विजय मोजण्यासाठी कठीण अशी एखादी गोष्ट असू शकेल. 'काय' हे जाणून घेण्याइतकेच 'का' असा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे, या विश्वासाने लहानाचं मोठं होणारं एखादं मूल यात असेल. अपयशी होण्याची शक्यता असलेल्या कल्पनेवर प्रयोग करण्याचा आत्मविश्वास बाळगणारा एखादा तरुण यात असेल. कोणताही द्वेष न ठेवता स्वतःचे मतभेद मांडण्याची सुरक्षितता वाटणारा एखादा नागरिक यात असेल. समृद्धी हे केवळ साधन आहे आणि ते प्रत्येक गोष्टीचं मोजमाप नाही, हे समजण्याइतका समृद्ध समाज यात असेल.
ही कोणतीही छोटी महत्त्वाकांक्षा नाहीये. स्वातंत्र्याचं हे अपूर्ण राहिलेलं मोठं काम आहे. १५ ऑगस्ट रोजी आपण ८० वर्षांपूर्वी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतोय. यावेळी आपण स्वतःला साधा आणि उपयुक्त प्रश्न विचारला पाहिजे. आपण आता आपल्या स्वातंत्र्याचं नेमकं काय करणार आहोत?
(लेखक अनुभवी पत्रकार आणि संवाद तज्ज्ञ आहेत.)