भारतीय-युक्रेनियन वंशाचे अमेरिकन अंतराळवीर अनिल मेनन यांनी एक मोठा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. नासाचे (NASA) अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन कॉस्मोनॉट्स यांनी बुधवारी पहाटे (भारतीय वेळेनुसार) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) यशस्वीपणे प्रवेश केला आहे. 'सॉयूझ एमएस-२९' (Soyuz MS-29) यायानातून सुमारे तीन तासांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यांचे तिथे मिठी मारून आणि हस्तांदोलन करून स्वागत करण्यात आले.
मेनन आणि रशियन अंतराळवीर प्योत्र दुब्रोव आणि अण्णा किकिना यांना घेऊन जाणाऱ्या रॉस्कोसमॉस (Roscosmos) या रशियन अंतराळयानाने मंगळवारी रात्री ८ वाजून १७ मिनिटांनी (IST) बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून उड्डाण केले होते. सुरुवातीच्या प्राथमिक कक्षेत पोहोचल्यानंतर, 'सॉयूझ एमएस-२९' ने रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी (IST) 'प्रिचल' (Prichal) मॉड्यूलवर डॉकिंग करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे आपला प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. अंतराळयान आणि स्पेस स्टेशनमध्ये काही आवश्यक तांत्रिक तपासण्या केल्यानंतर मेनन यांनी रात्री २:०० वाजता (IST) मुख्य दरवाजा उघडला. नासाने दिलेल्या माहितीनुसार, मेनन यांची ही पहिलीच अंतराळ मोहीम आहे. मेनन यांचे कुटुंबीय, ज्यात त्यांची अंतराळवीर पत्नी अण्णा विल्हेल्म यांचा समावेश आहे, हे या प्रसंगी उपस्थित होते.
मेनन, दुब्रोव आणि किकिना यांची ही मोहीम तब्बल आठ महिने चालणार असून ते एप्रिल २०२७ मध्ये पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे. या काळात मेनन मानवी अंतराळ मोहिमेला चालना देण्यासाठी आणि पृथ्वीवरील जीवनाचा फायदा व्हावा यासाठी वैज्ञानिक संशोधन करणार आहेत. विशेष म्हणजे, या रॉकेटमधून भारतीय शाळकरी मुलांनी काढलेली काही चित्रेही नेण्यात आली आहेत, जी युरी गागारीन यांच्या ६५ व्या उड्डाणाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांची आहेत.
४९ वर्षीय अनिल मेनन यांचा जन्म मिनियापोलिसमध्ये झाला. त्यांचे वडील के. पी. शंकरन मेनन हे केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील ओट्टपलम येथील आहेत, तर त्यांची आई एलिझाबेथ ही युक्रेनमधून अमेरिकेत आलेली एक स्थलांतरित आहे. मेनन हे इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन आहेत आणि यूएस स्पेस फोर्समध्ये कर्नल देखील आहेत. रोटरी अँबॅसिडोरियल स्कॉलर म्हणून पोलिओ लसीकरण मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी भारतात एक वर्ष घालवले आहे.
२०१४ मध्ये त्यांनी नासामध्ये फ्लाइट सर्जन म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर २०१८ मध्ये ते 'स्पेसएक्स' (SpaceX) मध्ये सामील झाले, जिथे त्यांनी 'स्टारशिप' रॉकेटच्या विकासात काम केले. स्पेस स्टेशनवर असताना मेनन सूक्ष्मगुरुत्वाकर्षणाचा (Microgravity) रक्तप्रवाह आणि मानवी शरीरावर होणारा शारीरिक परिणाम, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने वैद्यकीय तंत्रज्ञानाची चाचणी घेण्याचे महत्त्वाचे काम करणार आहेत.