व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या कारवाईनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

अमेरिकन फौजांनी व्हेनेझुएलाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून न्यूयॉर्कमधील तुरुंगात ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्हेनेझुएलातील ताज्या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. तेथील नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधित पक्षांना केले आहे.

लक्झेंबर्ग येथील एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आम्ही या घडामोडींमुळे चिंतीत आहोत. मात्र, सर्व संबंधित पक्षांनी आता एकत्र बसून चर्चेद्वारे व्हेनेझुएलातील जनतेच्या हिताचा आणि सुरक्षेचा विचार करून योग्य तोडगा काढावा, अशी आमची कळकळीची विनंती आहे."

व्हेनेझुएलातील नागरिक या संकटातून सुखरूप बाहेर पडावेत, हीच भारताची प्रमुख चिंता असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

जयशंकर पुढे म्हणाले, "सरतेशेवटी आमची काळजी हीच आहे की, ज्या देशासोबत आमचे अनेक वर्षांपासून अत्यंत चांगले संबंध राहिले आहेत, तो देश आणि तिथली जनता सध्याच्या घटनाक्रमातून आणि अस्थिरतेतून सुरक्षितपणे बाहेर पडायला हवी."

अमेरिकन फौजांनी ३ जानेवारी रोजी कराकसमध्ये अचानक केलेल्या हल्ल्यानंतर आणि मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलात हे संकट निर्माण झाले. अमेरिकेच्या एलिट डेल्टा फोर्सने व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना त्यांच्या बेडरूममधून बाहेर ओढून काढले आणि तिथून तातडीने विमानाने अमेरिकेत नेले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांपासून जमिनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली. ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांच्यावर ड्रग कार्टेल चालवणे आणि नार्को-टेररिझमचे आरोप केले होते. तसेच त्यांनी पद सोडावे यासाठी अमेरिकेकडून सातत्याने दबाव टाकला जात होता.

सध्या ब्रुकलिनच्या तुरुंगात असलेल्या मादुरो आणि त्यांच्या पत्नीला काल मॅनहॅटन न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मादुरो यांनी अतिशय ठाम भूमिका घेत फेडरल ड्रग तस्करीचे सर्व आरोप फेटाळून लावले. "मी माझ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे," असे सांगत त्यांनी स्पॅनिश भाषेत न्यायालयात आपण "निर्दोष आणि एक सभ्य माणूस" असल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १७ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आता अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.