परराष्ट्रमंत्री जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर क्वाड गटाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आज (सोमवारी) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. स्वतंत्र आणि खुल्या इंडो-पॅसिफिकसाठी समान दृष्टिकोन पुढे नेण्याच्या नव्या प्रस्तावांवर या बैठकीत लक्ष केंद्रित केले जाईल. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या निमंत्रणावरून जयशंकर ३० जून ते २ जुलै या कालावधीत अमेरिकेला भेट देतील.

१ जुलै रोजी होणारी क्वाड परराष्ट्रमंत्र्यांची बैठक २१ जानेवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या चर्चेवर आधारित असेल, असे मंत्रालयाने सांगितले. "ते प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर, विशेषत: इंडो-पॅसिफिकशी संबंधित मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. तसेच, भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेपूर्वी विविध क्वाड उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतील," असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

स्वतंत्र आणि खुल्या इंडो-पॅसिफिकच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्याच्या उद्देशाने असलेल्या नवीन प्रस्तावांवरही मंत्री विचार करतील अशी अपेक्षा आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश असलेला क्वाड गट इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यावर लक्ष केंद्रित करणारा एक महत्त्वाचा गट म्हणून उदयास आला आहे.

जयशंकर ३० जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात "द ह्यूमन कॉस्ट ऑफ टेररिझम" (The Human Cost of Terrorism) नावाच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही करतील. हे प्रदर्शन जगभरातील भीषण दहशतवादी कृत्यांचे मानवी जीवनावरील विनाशकारी परिणाम आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने उचललेली पाऊले यावर प्रकाश टाकेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. हे प्रदर्शन पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमापार दहशतवादाविरोधातील भारताच्या मोहिमेला जागतिक पाठिंबा मिळवण्याचा एक प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.