समाजवादी पक्षाच्या (सपा) कैरानाच्या खासदार इक्रा हसन यांनी पक्षाच्या नेत्यांना शांतता भंगाच्या आरोपाखाली अटक केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. इक्रा हसन यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजवादी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले असून, परिस्थिती पाहता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडे आपल्या तक्रारी घेऊन जाणाऱ्या सामान्य नागरिकांचे ऐकून घेतले जात नाही, उलट त्यांनाच विनाकारण अटक करून तुरुंगात पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप खासदार इक्रा हसन यांनी केला आहे.
माजी मंत्र्यांसह चार नेत्यांना अटक
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे माजी मंत्री आणि सपा नेते मंगेराम कश्यप यांच्यासह अन्य चार जणांना शांतता भंगाच्या आरोपाखाली मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली होती. या अटकेची माहिती मिळताच खासदार इक्रा हसन यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाणे गाठले आणि तिथेच धरणे धरले. अटक करण्यात आलेल्या नेत्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
"एकतर आमच्या लोकांना सोडून द्या किंवा मलाही त्यांच्यासोबत अटक करा," अशी भूमिका इक्रा हसन यांनी आंदोलनादरम्यान घेतली. यावेळी आंदोलक आणि पोलीस अधीक्षक (शहर) व्योम बिंदल तसेच एएसपी मनोज यादव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली.
अखिलेश यादव यांची भाजप सरकारवर टीका
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले की, "जेव्हा न्यायासाठी आवाज उठवणाऱ्यालाच ताब्यात घेतले जाते, तोच खऱ्या अर्थाने कलियुग असतो. समाजवादी पक्षाच्या खासदाराचा गुन्हा काय? त्यांचा गुन्हा एवढाच होता का, की त्या एका अशा आईला मदत करत होत्या जिने आपला मुलगा गमावला आहे आणि जिला भाजपच्या या निर्दयी राजवटीत न्यायासाठी प्रत्येक दारावर नकार पचवावा लागत आहे."
भाजपचे समर्थकही या जुलूमाचा निषेध करतील आणि 'पीडीए' (पिछडा, दलित, अल्पसंख्यक) हा अन्याय आता खपवून घेणार नाही, असेही माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात सपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन सुरूच होते.