​केरळ विधानसभा निवडणूक 2026: 140 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात; निकालाची धाकधूक वाढली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

​सकाळी साडेसहाच्या सुमारास निवडणूक आयोगाचे निरीक्षक, सुरक्षा कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम ठेवलेले स्ट्रॉंगरूम उघडण्यात आले. मतमोजणीची सुरुवात टपाली मतदानाची (पोस्टल बॅलेट) मोजणी करून झाली. एकूण मतदानापैकी १.३६ टक्के टपाली मतदान झाले आहे.

​१४० जागांसाठी ८८३ उमेदवार रिंगणात

​केरळमध्ये एकूण २ कोटी ७१ लाखांहून अधिक मतदार असून, १४० विधानसभा मतदारसंघांमध्ये ७९.६३ टक्के मतदान झाले होते. केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी रतन यू. केळकर यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, १ मे पर्यंत प्राप्त झालेले टपाली मतदान गृहीत धरल्यास मतदानाची टक्केवारी ७९.७० टक्क्यांपर्यंत गेली आहे. या निवडणुकीत १४० जागांसाठी एकूण ८८३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

​मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने मोठी तयारी केली आहे. यासाठी १५,४६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामध्ये १४० निवडणूक निर्णय अधिकारी, १,३४० अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी आणि हजारो पर्यवेक्षकांचा समावेश आहे. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेसाठी केंद्रीय दलाच्या २५ तुकड्या आणि राज्य पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभर पाळत ठेवली आहे.

​राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला

​एक्झिट पोलच्या अंदाजानुसार केरळमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, २०१६ पासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसप्रणीत यूडीएफला किंचित आघाडी मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२१ मध्ये ४१ जागा जिंकणाऱ्या यूडीएफला यंदा ८० ते ९० जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्याचा विश्वास सत्ताधारी एलडीएफने व्यक्त केला आहे. जर एलडीएफचा पराभव झाला, तर १९६० च्या दशकानंतर पहिल्यांदाच भारतातील कोणत्याही राज्यात डाव्या पक्षांची सत्ता नसेल.

​तसेच, भाजपप्रणीत एनडीए केरळमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि २० टक्क्यांहून अधिक मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२१ च्या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती, त्यामुळे या निकालाकडे त्यांचे विशेष लक्ष आहे.