काश्मीरमध्ये पर्यटनाचे वारे पुन्हा वाहणार! १४ प्रमुख पर्यटन स्थळे खुली करण्याचा राज्यपालांचा आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहा महिन्यांनी जम्मू-काश्मीरमधील पर्यटन उद्योगाला दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी १४ प्रमुख पर्यटन स्थळे तात्काळ खुली करण्याचे आदेश दिले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रदेशातील पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सुरक्षेचा सविस्तर आढावा आणि सखोल चर्चेनंतर ही पर्यटन स्थळे आता पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी पुन्हा खुली केली जातील, असे सिन्हा यांनी स्पष्ट केले.

नायब राज्यपाल सिन्हा म्हणाले, "सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेतल्यावर मी काश्मीर आणि जम्मू विभागातील आणखी काही पर्यटन स्थळे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ही ठिकाणे तात्पुरती बंद ठेवली होती." मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून पर्यटनावर लादलेल्या निर्बंधांनंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 

या नवीन निर्णयामुळे आता एकूण ४८ पैकी ४२ बंद असलेली पर्यटन स्थळे पुन्हा सुरू झाली आहेत. २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये २५ पर्यटकांचा समावेश होता. या घटनेनंतर खबरदारी म्हणून ही सर्व ठिकाणे बंद केली होती.

त्या भीषण हल्ल्यानंतर खोऱ्यातून पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. याचा मोठा फटका स्थानिक अर्थव्यवस्थेला बसला असून पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना आपले रोजगार गमवावे लागले होते. सरकारने यापूर्वी जूनमध्ये १६ आणि सप्टेंबरमध्ये १२ पर्यटन स्थळे टप्प्याटप्प्याने खुली करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सुरुवातीला पर्यटकांचा म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. 

डिसेंबरमधील जोरदार बर्फवृष्टी या क्षेत्रासाठी टर्निंग पॉइंट ठरली. जानेवारीत एक लाखांहून अधिक पर्यटकांनी खोऱ्याला भेट दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनेक महिन्यांच्या मंदीनंतर पर्यटनाच्या पुनरुज्जीवनाचे हे पहिले सकारात्मक संकेत आहेत.

आता पर्यकांसाठी खुली झालेल्या प्रसिद्ध ठिकाणांमध्ये दूधपथरी, कोकरनाग, पीर की गली आणि श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचा समावेश आहे. ही ठिकाणे खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती बंद केली असली तरी, सध्याच्या सुरक्षा तपासणीनुसार परिस्थिती स्थिर आहे. त्यामुळे पर्यटकांचे पुन्हा या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी स्वागत करण्यास हरकत नसल्याचा विश्वास नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला आहे.



Latest News