लोकसभा निवडणुक २०२४: शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता उद्या (गुरुवारी) होणार आहे. आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांसाठी शनिवारी (ता १ जून) मतदान होणार आहे.

या टप्प्यात उत्तर प्रदेश व पंजाबमधील प्रत्येकी १३, पश्चिम बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा, हिमाचलमधील चार, झारखंडमधील तीन जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंडीगडमध्ये मतदान होईल.

उत्तर प्रदेशात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्यात महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगांव, घोसी, सालेमपूर, बलिया, गाझीपूर, चंदौली, वाराणशी, मिर्झापूर आणि रॉबर्ट्सगंज या मतदारसंघांचा समावेश आहे.

पंजाबमध्ये गुरुदासपूर, अमृतसर, खंदूरसाहिब, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगड साहिब, फरीदकोट, फिरोजपूर, भटिंडा, संगरुर आणि पतियाळा मतदारसंघात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या नऊ ठिकाणी मतदार मतदानाचा हक्क बजावणार  होणार आहेत, त्यात डमडम, बारासात, बशीरहाट, जयानगर, माथूरपूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर यांचा समावेश आहे.

ओडिशामध्ये मयूरभंज, बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रापारा, जगतसिंगपूर या सहा जागी तर हिमाचलमध्ये मंडी, कांगडा, हमीरपूर आणि सिमला मतदारसंघात मतदान होईल. याशिवाय झारखंडमधील राजमहल,

दुमका आणि गोड्डामध्ये मतदान होणार आहे. बिहारमध्ये नालंदा, पाटणासाहिब, पाटलीपुत्र, आरा, बक्सर, सासाराम, काराकाट, जहानाबाद येथे मतदान होईल. अखेरच्या टप्प्यात रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या ९०४ इतकी आहे. यात पंजाबमध्ये सर्वाधिक ३२८ उमेदवार लढा देत आहेत.

अंतिम टप्प्यात जे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्याविरोधात मैदानात असलेले काँग्रेसचे नेते अजय राय यांचा समावेश आहे. वाराणसी मतदारसंघात उभयंताची लढत होईल.

मंडी मतदारसंघात अभिनेत्री कंगना राणावत आणि कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह अशी लढत होत आहे. गोरखपूरमध्ये भाजपच्या रवी किशन विरुद्ध सपच्या काजल निषाद असा मुकाबला होत आहे. तर हमीरपूरमध्ये अनुराग ठाकूर यांचा सामना कॉँग्रेसच्या सतपाल रायजादा यांच्याशी होत आहे.

डायमंड हार्बरमध्ये तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांची लढत माकपच्या प्रतिकूर रहमान आणि भाजपच्या अभिजित दास यांच्याशी होत आहे. अन्य प्रमुख उमेदवारांत अपना दलच्या अनुप्रिया पटेल, भाजपचे महेंद्रनाथ पांडेय, रवीशंकर प्रसाद, रामकृपाल यादव, तरणजित सिंह संधू, तापस राय, सीता सोरेन, निशिकांत दुबे, मनीष तिवारी, चरणजीत सिंह चन्नी, आनंद शर्मा, राजदच्या मिसा भारती आदींचा समावेश आहे.