पंढरपुरात मंदिराची भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू तर १४ जण जखमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 h ago
चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या मंदिराची कोसळलेली भिंत
चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या मंदिराची कोसळलेली भिंत

 

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथील चंद्रभागा नदीच्या काठावर असलेल्या एका मंदिराची भिंत अचानक कोसळल्याने ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून परिसरात होत असलेल्या पावसामुळे ही जुनी भिंत कमकुवत झाली होती. बुधवारी अचानक ही भिंत कोसळली आणि त्याखाली आश्रयाला उभे असलेले भाविक दबले गेले. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही भाविकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृत भाविक हे राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आले होते. प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे पंढरपुरात येणाऱ्या वारकरी आणि भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.