उत्तराखंडच्या डोंगरदऱ्यात जपला जातोय हिंदू-मुस्लिम भाईचारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
बिहारहून आलेल्या मौलवी मोहम्मद इरशाद यांच्याशी ममता संवाद साधताना
बिहारहून आलेल्या मौलवी मोहम्मद इरशाद यांच्याशी ममता संवाद साधताना

 

नवी दिल्ली

उत्तराखंडमध्ये मुस्लिमांना लक्ष्य करून धार्मिक घोषणा दिल्या जातात किंवा आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या जातात, अशा बातम्या आपण वारंवार ऐकतो. मात्र, राज्यातील हिंदू-मुस्लिम एकता, प्रेम आणि भाईचारा अधोरेखित करणारे रिपोर्ट्स क्वचितच हेडलाईन्स बनतात. उत्तराखंडच्या डोंगरदऱ्यात आजही अजानचा आवाज घुमतो आणि लग्न असो वा कोणताही सण, स्थानिक मुस्लिम आणि हिंदू ते एकत्र मिळून साजरे करतात.

सामुदायिक सलोख्याचं हे चित्र ममता नावाची एक डोंगरदऱ्यातील महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणत आहे. यूट्यूबपासून फेसबुकपर्यंत सर्वच प्लॅटफॉर्मवर त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. वृत्तपत्रं आणि टीव्ही चॅनेल अनेकदा ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ते उत्तराखंडमधील प्रेम आणि एकतेचं दर्शन त्या घडवत आहेत. सोशल मीडियावर त्यांना 'मिस्टर अँड मिसेस रावत' या नावाने ओळखलं जातं.

ममता रावत आपल्या एका व्हिडिओत म्हणतात, "देवभूमी उत्तराखंडमधून आपणा सर्वांना नमस्कार. आज आम्ही रामा गावात आलो आहोत. पाहा, गावाच्या मध्यभागी एक सुंदर मस्जिद आहे. इथे मौलवी देखील उपस्थित आहेत आणि लोक नमाजसाठी येतात. गावातील काही लोक रोजगार हमीच्या कामात व्यस्त आहेत."

 

त्या पुढे म्हणतात, "रामा गावाचं नाव ऐकताच लोक म्हणतात की हे मुस्लिमांचं गाव आहे. हे गाव खूप जुनं असून इथे अनेक वर्षांपासून लोक राहत आहेत. सर्व जण शांततेने एकत्र राहतात. इथे कधीही भांडण किंवा संघर्ष होत नाहीत. प्रत्येक जण प्रेम आणि भाईचाऱ्याने सहजीवन जगतो."

सोशल मीडियाची संस्कृती ओळखून त्या पुढे म्हणतात, "मित्रांनो, कृपया नकारात्मक कमेंट्स करणं टाळा. हे गाव खूप सुंदर आहे आणि इथली माणसं दयाळू आणि मैत्रीपूर्ण आहेत. ते आमच्या लग्नात, उत्सवात आणि सुख-दुखाच्या काळात आमच्यासोबत सहभागी होतात."

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ममता बिहारहून आलेल्या मौलवी मोहम्मद इरशाद यांच्याशी संवाद साधतात. मौलवींना ४ मुलं आहेत आणि ते इथे राहून खूप आनंदी आहेत. स्थानिक मुस्लिम दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात आणि मस्जिद अतिशय नीटनेटकी ठेवली जाते. इथले गावकरी साधे, प्रामाणिक आणि प्रेमळ असल्याचं इमाम सांगतात. शेती मर्यादित असली तरी प्रत्येक जण आपल्या कामात आणि आयुष्यात समाधानी आहे.

आणखी एका क्लिपमध्ये त्या म्हणतात, "मी सध्या एका लग्न समारंभात आहे आणि मला इथलं जेवण दाखवू द्या. आम्ही एखाद्या सामुदायिक पंगतीत बसून जसे एकत्र जेवतो, अगदी तसंच हे आहे. प्रत्येक जण एकत्र बसून भाजी, पोळी आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेत आहे."

त्या आवर्जून सांगतात की, "इथे हिंदू आणि मुस्लिम लग्नांमध्ये आणि उत्सवांमध्ये एकत्र सहभागी होतात. कोणालाही भेदभावाचा सामना करावा लागत नाही. बाहेरच्या लोकांचे काही पूर्वग्रह असू शकतात, पण इथे आल्यावर खूप छान वाटतं. मस्जिदमध्ये पाच वेळा नमाज अदा केली जाते आणि रहिवासी तिथे नियमितपणे उपस्थित राहतात."

शेवटी ममता रावत म्हणतात, "माणूस धर्मामुळे वाईट नसतो. हिंदू किंवा मुस्लिम कोणीही उपजतच वाईट नसतात. वाईटपणा हा मानवी विचारसरणीमध्ये असतो. प्रत्येकाचं रक्त एकच आहे आणि आपण सगळे आधी माणसं आहोत. माणुसकी हेच सर्वात मोठं मूल्य आहे. द्वेष आणि जातीयवादाऐवजी आपण प्रेम आणि भाईचारा स्वीकारला पाहिजे. रामा गावाची ही कथा आपल्याला शिकवते की एकत्र राहणं, एकमेकांचा आदर करणं आणि प्रेम व्यक्त करणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे."