पंतप्रधानांच्या भेटीला दिग्गजांची मांदियाळी! इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि कॉग्निझंटच्या सीईओंनी केली चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
मायक्रोसॉफ्ट सीईओ  सत्या नडेला आणि पंतप्रधान मोदी
मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला आणि पंतप्रधान मोदी

 

नवी दिल्ली

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील तीन बलाढ्य कंपन्यांच्या प्रमुखांनी मंगळवारी (९ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella), इंटेलचे प्रमुख लिप-बू टॅन (Lip-Bu Tan) आणि कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस. (Ravi Kumar S) यांनी नवी दिल्लीत पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान तिन्ही दिग्गजांनी भारताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सेमिकंडक्टर (चिप निर्मिती) क्षेत्रातील धोरणांचे भरभरून कौतुक केले. तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासात साथ देण्यासाठी मोठ्या घोषणाही केल्या.

मायक्रोसॉफ्टची ऐतिहासिक गुंतवणूक

या भेटीतील सर्वात मोठी बातमी म्हणजे मायक्रोसॉफ्टने केलेली गुंतवणुकीची घोषणा. सत्या नडेला यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची (सुमारे १.४ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. आशिया खंडातील मायक्रोसॉफ्टची ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

याआधी जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने ३ अब्ज डॉलर्सची घोषणा केली होती, पण आता त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. नडेला म्हणाले, "भारताच्या एआय संधींबद्दल पंतप्रधान मोदींशी खूप प्रेरणादायी चर्चा झाली. भारताच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही डेटा सेंटर्स, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि एआय क्षमता उभारण्यासाठी ही मोठी गुंतवणूक करत आहोत."

इंटेलचा 'सेमिकंडक्टर मिशन'ला पाठिंबा

इंटेलचे प्रमुख लिप-बू टॅन यांनी पंतप्रधान मोदींच्या सेमिकंडक्टर धोरणाचे विशेष कौतुक केले. भारत सरकारने देशात चिप डिझाईन आणि निर्मितीसाठी ७६,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या 'इंडिया सेमिकंडक्टर मिशन'ला इंटेल पूर्ण ताकदीने पाठिंबा देईल, अशी ग्वाही टॅन यांनी दिली.

मोदींसोबतच्या भेटीचा फोटो शेअर करत टॅन म्हणाले, "तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटिंग क्षेत्रातील भारताच्या प्रचंड क्षमतेबद्दल आमच्यात विस्तृत चर्चा झाली. सर्वसमावेशक सेमिकंडक्टर धोरण राबवल्याबद्दल मी पंतप्रधानांचे अभिनंदन करतो."

कॉग्निझंटचा विस्तार आणि कौशल्य विकास

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी कॉग्निझंटनेही भारताच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कंपनीचे सीईओ रवी कुमार यांनी एआयचा वापर वाढवणे आणि कर्मचाऱ्यांचे कौशल्य (skilling) सुधारणे यावर भर दिला. विशेष म्हणजे, देशाचा समान विकास व्हावा यासाठी कॉग्निझंट आता भारतातील उदयोन्मुख शहरांमध्ये (Emerging Cities) आपला विस्तार करणार आहे.

रवी कुमार यांनी 'X' वर पोस्ट करत म्हटले, "भारताच्या 'एआय-फर्स्ट' रोडमॅपवर पंतप्रधान मोदीजींशी चर्चा करणे हा एक अद्भुत अनुभव होता. जागतिक स्तरावर एआयचा वेग वाढवणे, शिक्षण आणि कौशल्य विकासात सुधारणा करणे आणि त्यातून उत्पादकता वाढवणे यावर आमचे एकमत झाले."

या भेटीत कॉग्निझंट इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश वॉरियर हे देखील उपस्थित होते.