ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

सिडनी / कॅनबेरा

बुधवारपासून (१० डिसेंबर २०२५) ऑस्ट्रेलियाने एक ऐतिहासिक पाऊल उचलत १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे. अशी बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. या नवीन कायद्यानुसार, आता लहान मुलांना टिकटॉक, गुगलचे युट्यूब आणि मेटाचे इन्स्टाग्राम  व फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर करता येणार नाही.

मंगळवारी मध्यरात्रीपासूनच  जगातील १० मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लहान मुलांचे ॲक्सेस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर या कंपन्यांनी नवीन कायद्याचे पालन केले नाही, तर त्यांना ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे ३३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स / २७० कोटी रुपये) पर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. पालकांनी आणि बाल हक्क कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर टेक कंपन्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाद्यांनी यावर टीका केली आहे.

पंतप्रधानांचा संदेश: "मैदानात खेळा!"

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी हा दिवस देशातील कुटुंबांसाठी "अभिमानाचा दिवस" असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी धोरणकर्ते सक्षम आहेत, हे या कायद्याने सिद्ध केले आहे.

'एबीसी न्यूज'शी बोलताना पंतप्रधान अल्बानीज म्हणाले, "हा तो दिवस आहे जेव्हा ऑस्ट्रेलियन कुटुंबे या बड्या टेक कंपन्यांकडून आपली ताकद परत मिळवत आहेत. नवीन तंत्रज्ञान चांगल्या गोष्टी करू शकते, पण आपल्या नशिबावर मानवाचे नियंत्रण असले पाहिजे आणि हा कायदा त्याबद्दलच आहे."

या आठवड्यात ऑस्ट्रेलियातील शाळांमध्ये पंतप्रधानांचा एक व्हिडिओ संदेश दाखवला जाणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या तोंडावर त्यांनी मुलांना आवाहन केले आहे की, "एखादा नवीन खेळ सुरू करा, एखादे वाद्य वाजवायला शिका किंवा कपाटात खूप दिवसांपासून धूळ खात पडलेले पुस्तक वाचा."

जगाचे लक्ष ऑस्ट्रेलियाकडे

डेन्मार्क, न्यूझीलंड आणि मलेशियासह अनेक देशांनी संकेत दिले आहेत की ते ऑस्ट्रेलियाच्या या मॉडेलचा अभ्यास करतील. भाषण स्वातंत्र्य किंवा नवोपक्रमाला बाधा न आणता सरकार वयोमर्यादा किती कठोर करू शकते, यासाठी ऑस्ट्रेलिया आता जगासाठी एक 'टेस्ट केस' बनला आहे.

एलॉन मस्क यांच्या 'X' ची माघार

एलॉन मस्क यांच्या 'X' (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मने सुरुवातीला विरोध केला होता, पण बुधवारी त्यांनी कायद्याचे पालन करणार असल्याचे जाहीर केले. १० प्रमुख प्लॅटफॉर्म्सपैकी 'X' ने सर्वात शेवटी याची अंमलबजावणी केली.

'X' ने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे, "ही आमची निवड नाही, तर ऑस्ट्रेलियन कायद्याची ती गरज आहे. जे वापरकर्ते आमच्या वयोमर्यादेच्या अटी पूर्ण करत नाहीत, त्यांना 'X' आपोआप लॉग-आउट करेल."

कशी होणार अंमलबजावणी?

सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारला सांगितले की, ते वापरकर्त्याचे वय ओळखण्यासाठी विविध पद्धती वापरतील. यामध्ये 'एज इन्फरन्स' (वापरकर्त्याच्या वागणुकीवरून वय ओळखणे), सेल्फीद्वारे वयाचा अंदाज लावणे, ओळखपत्र अपलोड करणे किंवा बँक खात्याचे तपशील तपासणे यांसारख्या पर्यायांचा समावेश असेल.

ऑस्ट्रेलिया सरकारने स्पष्ट केले की, जसजशी नवीन उत्पादने येतील आणि तरुण मुले इतर ॲप्सकडे वळतील, तशी बंदी असलेल्या प्लॅटफॉर्मची यादी बदलली जाईल.

मुलांचे मत काय?

सरकारी आकडेवारीनुसार, बंदी लागू होण्यापूर्वी ८ ते १५ वयोगटातील ८६% ऑस्ट्रेलियन मुले सोशल मीडिया वापरत होती. काही तरुणांनी या बंदीमुळे एकटेपणा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

बंदी लागू होण्यापूर्वी १४ वर्षीय ॲनी वांग म्हणाली, "क्विअर लोक आणि ज्यांना काहीतरी वेगळे छंद आहेत, त्यांच्यासाठी हे खूप वाईट ठरेल. कारण त्यांना त्यांच्यासारखी कम्युनिटी फक्त सोशल मीडियावरच मिळते. काही लोक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा मदत मागण्यासाठी याचा वापर करतात... त्यामुळे काहींसाठी हे ठीक असेल, पण काहींच्या मानसिक आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो."