भोपाळ
मध्य प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) आंतरराज्य रॅडिकलायझेशन मॉड्यूलचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. ऑनलाइन ग्रुपच्या माध्यमातून तरुणांचे कट्टरपंथीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नेटवर्कमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील संशयितांचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मध्य प्रदेश एटीएसने सर्वप्रथम भोपाळच्या काझी कॅम्प भागातून मोहम्मद फराज (वय ३५) याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील नानौता येथून नईम अब्दुल्ला कुरेशी (वय ३८) आणि राजस्थानच्या अलवरमधून मोहम्मद शाकीर (वय ३४) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई एटीएस, यूपी एसटीएफ आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांनी संयुक्तपणे केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील चौथ्या संशयिताचा शोध सुरू असून लवकरच त्यालाही अटक होण्याची शक्यता आहे.
तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, हे तिघेही पाकिस्तानातील एका हँडलरद्वारे संचालित केल्या जाणाऱ्या बंदिस्त ऑनलाइन ग्रुपचा भाग होते. एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांचे ब्रेनवॉशिंग आणि रिक्रूटमेंट केले जात होते. मोहम्मद फराज हा खासगी क्लिनिकमध्ये काम करत होता आणि तो गेल्या दोन वर्षांपासून या नेटवर्कच्या संपर्कात होता. फराज आणि कुरेशी हे दोघेही उत्तर प्रदेशातील देवबंद येथील एका मदरसात एकत्र शिकले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
एटीएसने संशयितांकडून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि डिजिटल साहित्य जप्त केले आहे. यामध्ये कट्टरतावादी विचार पसरवणारे व्हिडिओ आणि इतर साहित्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या नेटवर्कचा विस्तार नेमका किती आहे आणि त्यांच्या भविष्यातील हालचाली काय होत्या, याचा सखोल तपास सुरू आहे.