NEET Exam : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 8 Months ago
सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

 

अनियमितता तसेच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेच्या(नीट) अनुषंगाने दाखल झालेल्या चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने शहर आणि परीक्षा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) दिले होते. त्यानुसार एनटीएने शनिवारी शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर केला होता.

‘नीट’ संदर्भातील याचिकांवर सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. समुपदेशन तोंडावर आले असल्याने याचिकांवर न्यायालय अंतिम निकाल देणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नीट-यूजी परीक्षा पुन्हा घेण्यात यावी असे वाटत असेल तर व्यापक प्रमाणात प्रश्नपत्रिका फुटल्याचे सिद्ध करा, अशी विचारणा सरन्यायाधीशांनी मागीलवेळी याचिकाकर्त्यांना केली होती.

शहर आणि केंद्रनिहाय निकालामध्ये काही निकाल चकित करणारे आले आहेत. त्यामुळे यासंदर्भात न्यायालय काही भाष्य करणार काय, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. गुजरातमधील राजकोट केंद्रातील ७० टक्के विद्यार्थी नीट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे १२ विद्यार्थ्यांना सातशेपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. याचप्रमाणे राजस्थानमधील सिकर येथील केंद्रातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राजस्थानचा विचार केला तर सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४८२ इतकी आहे. महाराष्ट्रात हीच संख्या २०५ इतकी आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर क्रमश: केरळ आणि उत्तर प्रदेश असून वरील राज्यांतील क्रमश: १९४ आणि १८४ विद्यार्थ्यांना सातशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

भौगोलिक व्याप्ती वाढल्याचा दावा
‘नीट’ २०२३ च्या तुलनेत ‘नीट’ २०२४ च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भौगोलिक प्रतिनिधित्वाची व्याप्ती वाढल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. यंदा ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या २३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांपैकी दोन हजार ३२१ विद्यार्थ्यांना सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले. हे विद्यार्थी २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २७६ शहरांतील एक हजार ४०४ केंद्रातून परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असून त्यापैकी अनेकजण पारंपारिक शिकवणी वर्गांचे विद्यार्थी नाहीत, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले आहे.

सूत्रांच्या मते सीकर,कोटा आणि कोट्टायमसारख्या शिकवणी वर्गांच्या विद्यार्थ्यांनीही सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. पण या यादीत लखनौ (३५), कोलकता (२७), लातूर (२५), नागपूर (२०), फरीदाबाद (१९), नांदेड (१८), इंदूर (१७), कटक आणि कानपूर (प्रत्येकी १६), कोल्हापूर, नोईडा, साहिबजादा अजितसिंह नगर (प्रत्येकी १४), आग्रा आणि अलीगड (प्रत्येकी १३), अकोला आणि पतियाळा (प्रत्येकी १०), दावणगिरी (८) आणि बनासकांठा (७) येथील केंद्रांतून परीक्षा देऊन सातशे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविण्याची प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे.

६५० ते ६९९ दरम्यान गुण प्राप्त करणारे विद्यार्थी

(५०९ शहरे, ४०४४ केंद्रे)

६०० ते ६४९ दरम्यान गुण प्राप्त करणारे विद्यार्थी

(५४० शहरे, ४४८४ केंद्रे)

५५० ते ५९९ दरम्यान गुण प्राप्त करणारे विद्यार्थी

(५४८ शहर, ४५६३ केंद्र)

१ ते १०० क्रमांकांदरम्यानचे विद्यार्थी (५६ शहरे, ९५ केंद्रे)

१०१ ते १००० क्रमांकांदरम्यानचे विद्यार्थी

(१८७ शहरे, ७०६ केंद्रे)

१००१ ते १०००० क्रमांकांदरम्यानचे विद्यार्थी

(४३१ शहरे, २९५९ केंद्रे)