लाल किल्ला स्फोट प्रकरणात NIA कडून आणखी दोन दहशतवाद्यांना अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटाच्या कटात सामील असलेल्या आणखी दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण अटकेत असलेल्यांची संख्या आता ११ झाली आहे.

या दोघांची ओळख झमीर अहमद अहंगर (गांदरबल, जम्मू-काश्मीर) आणि तुफैल अहमद भट्ट (श्रीनगर, जम्मू-काश्मीर) अशी पटली आहे. दिल्ली स्फोटाशी संबंधित कटात सक्रिय सहभाग असल्याबद्दल 'एनआयए'ने त्यांना रितसर अटक केली. या दोघांनी दिल्ली स्फोटातील मुख्य आरोपीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला होता, अशी माहिती NIA च्या तपासातून समोर आली आहे.

१० नोव्हेंबर २०२५ रोजी देशाला हादरवून सोडणाऱ्या या स्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. या भीषण स्फोटात मुख्य आरोपी उमर उन नबी हा देखील मारला गेला होता. या भयंकर दहशतवादी कृत्यामागचा संपूर्ण कट उघड करण्याच्या उद्देशाने 'एनआयए' या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासादरम्यान झमीर अहमद आणि तुफैल अहमद हे 'अन्सार गझवत-उल-हिंद' (AGH) या दहशतवादी संघटनेचे सक्रिय ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGWs) असल्याचे आढळले.

जम्मू-काश्मीर पोलीस, हरियाणा पोलीस आणि इतर यंत्रणांच्या समन्वयाने 'एनआयए' तपास करत आहे. झमीर आणि तुफैल हे केवळ या स्फोटाच्या कटातच नव्हे, तर इतर विविध दहशतवादी कटांमध्येही सामील होते, असे तपासात पुढे आले आहे. अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार, "ते भारतीय राज्याविरुद्ध वापरण्यासाठी शस्त्रे आणि दारूगोळा गोळा करण्यात व्यस्त होते. पुराव्यांच्या सखोल तपासणीतून 'एनआयए'ने ही माहिती शोधून काढली आहे."

राष्ट्रीय दहशतवाद विरोधी यंत्रणेच्या निष्कर्षांनुसार, दिल्ली स्फोटाचा कट उमरने इतर आरोपींच्या मदतीने रचला होता. यामध्ये मुजम्मिल गनाई, शाहीन सईद, मुफ्ती इरफान, अदिल अहमद रादर आणि इतर पाच जणांचा समावेश होता. या पाच जणांनी मुख्य कटकार्यांना आश्रय आणि रसद पुरवली होती. या नऊ जणांना यापूर्वीच जम्मू-काश्मीर आणि हरियाणातील विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली होती.

आज पटियाला हाऊस न्यायालयाने दिल्ली स्फोटातील दोन्ही आरोपींना, तुफैल अहमद भट्ट आणि झमीर अहमद अहंगर यांना १० दिवसांची 'एनआयए' कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, ते शस्त्रे आणि दारूगोळा गोळा करत असल्याचा आरोप आहे. उमर उन नबी, मुफ्ती इरफान अहमद आणि डॉ. अदिल अहमद रादर यांनी झमीर अहमद अहंगरला एक रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे दिली होती. हे दोन्ही आरोपी 'अन्सार गझवत-उल-हिंद' या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. आरोपींकडून अधिक विशिष्ट तपशील मिळवण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांच्या मागे असलेला मोठा कट उघड करण्यासाठी 'एनआयए'ने १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.