"जातिनिहाय जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय असून समाजाच्या कल्याणासाठी जातिनिहाय जनगणना करायला हरकत नाही पण त्याचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जाऊ नये," असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सोमवारी व्यक्त करण्यात आले. केरळमधील पलक्कड येथे झालेल्या रा. स्व. संघाच्या समन्वय बैठकीच्या समारोपावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत संघाची भूमिका स्पष्ट केली.
"जातिनिहाय जनगणना हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असून देशाच्या अखंडतेच्यादृष्टीने आणि एकात्मतेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या जाती मागे राहिल्या आहेत त्यांचा उत्कर्ष व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जाणे आवश्यक असून त्यासाठी सरकारकडे आकडेवारी असणे आवश्यक आहे. त्यामुळे जातिनिहाय जनगणना करायला हरकत नाही अशी संघाची भूमिका आहे. मात्र जातिनिहाय जनगणनेचा वापर निवडणुकीतील लाभासाठी राजकीय हत्यार म्हणून केला जाऊ नये," असे आंबेकर म्हणाले.
दलितांची गणना करा
आपल्या समाजात जातीगत प्रतिक्रियांचा हा संवेदनशील मुद्दा आहे. राष्ट्रीय एकीकरणासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. पण जातीगणनेचा वापर केवळ निवडणूक प्रचार आणि निवडणुकीच्या उद्देशाने होऊ नये. कल्याणकारी उद्देशाने त्याचा वापर झाला पाहिजे. त्यातही दलित समाजाची लोकसंख्या जाणून घेण्यासाठी सरकारने त्यांची जनगणना केली पाहिजे, असं संघाचे अखिल भारतीय प्रचारक सुनील आंबेकर यांनी म्हटलं आहे.
बंगालच्या घटनेवर चिंता
या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्देवी घटनेवर विस्ताराने चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यातील दुरुस्तीवर संघाने यावेळी जोर दिला. महिलांची सुरक्षा हा संवेदनशील मुद्दा असल्याचं संघाने म्हटलं. महिला सुरक्षेबाबत पाच टप्प्यांमध्ये ही चर्चा करण्यात आली. कायदा, जागरूकता, संस्कार, शिक्षण आणि आत्मसंरक्षण या मुद्द्यांवर ही चर्चा झाली. या मुद्द्यांवर महिलांच्याबाबतीतील सुरक्षा मोहीम हाती घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.