जम्मू
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारकडे राज्याचा दर्जा (Statehood) बहाल करण्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी जम्मूमध्ये एका मोठ्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी घोषणा केली की, येत्या २० जुलै रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जातील. जम्मूतील महाराजा हरी सिंग पार्कमध्ये आयोजित केलेली ही रॅली गेल्या अनेक वर्षांतील त्यांची पहिली मोठी जाहीर सभा होती.
आता शांत बसणार नाही
सभेला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "आता खूप झाले! आम्ही अधिक काळ वाट पाहू शकत नाही. आमची शालीनता ही कमजोरी मानली जात आहे आणि आमचा संयम आता संपला आहे." त्यांनी केंद्रावर टीका करताना सांगितले की, केंद्र सरकार 'योग्य वेळ' येईल असे म्हणत केवळ टाळाटाळ करत आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन दिले होते, मग आता ते पूर्ण का केले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीतच का आंदोलन?
दिल्लीमध्ये निदर्शने का केली जात आहेत, यावर बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, जर देशातील एखाद्या भागाचे निर्णय देशाच्या राजधानीत घेतले जात असतील, तर आंदोलनासाठी दिल्ली हेच योग्य ठिकाण आहे. राज्य दर्जा हा जम्मू-काश्मीरच्या जनतेचा अधिकार आहे, कोणतीही मेहेरबानी नाही. आपण अमेरिकेत किंवा व्हाईट हाऊससमोर आंदोलन करत नसून, आपल्याच देशाच्या राजधानीत आपण हक्कासाठी आवाज उठवत आहोत, असेही ते म्हणाले.
प्रशासकीय मर्यादा आणि अडथळे
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नमूद केले की, केंद्रशासित प्रदेशाच्या मर्यादांमुळे सरकारला काम करताना प्रशासकीय अडथळे येत आहेत. अनेक महत्त्वाची खाती निवडून आलेल्या सरकारकडे नसून ती केंद्राच्या नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे, जनतेने दिलेल्या कौलाचा मान राखून केंद्राने दिलेले आश्वासन त्वरित पाळावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.