नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल केला असून, आता नवीन मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी 'फॉर्म ६' सोबत आपल्या पालकांचा 'स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन' (SIR) तपशील जोडणे अनिवार्य केले आहे. केवळ विद्यमान मतदारच नव्हे, तर नवीन अर्ज करणाऱ्या मतदारांनाही हा नियम लागू असेल, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बदल 'फॉर्म ६' मध्ये कोणताही कायदेशीर बदल न करता केवळ सूचनेद्वारे लागू करण्यात आला आहे. जर एखादा नागरिक ऑनलाइन पद्धतीने 'फॉर्म ६' भरत असेल, तर पालकांचा हा तपशील दिल्याशिवाय तो अर्ज पुढे जाऊ शकत नाही. ही प्रक्रिया मतदारांचे मॅपिंग करण्यासाठी आणि नवीन मतदारांना अर्जासोबत सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी मदत करेल.
बिहारमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेत या घोषणेचा समावेश करण्यात आला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, असे आयोगाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
दुसरीकडे, निवडणूक आयोगाने 'स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रियेच्या पारदर्शकतेचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) काही प्रतिनिधींनी या प्रक्रियेवर उपस्थित केलेल्या शंका फेटाळून लावत आयोगाने म्हटले की, ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, घटनात्मक आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. मतदार यादीतील दुबार, मृत, स्थलांतरित आणि परदेशी मतदारांची नावे काढून सर्व पात्र भारतीय नागरिकांचा समावेश करणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्रामसह इतर भागांतून अल्पसंख्याक मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांचेही आयोगाने खंडन केले असून, मतदारांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.