India Helps Venezuela : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलात धावून गेले भारतीय लष्कर!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये मदत कार्य सुरू करताना भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल आणि वैद्यकीय पथक
भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये मदत कार्य सुरू करताना भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल आणि वैद्यकीय पथक

 

भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झालेल्या व्हेनेझुएलामध्ये भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. ऑपरेशन अमिनो अंतर्गत व्हेनेझुएलामध्ये तैनात करण्यात आलेले भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल आता पूर्णपणे कार्यान्वित झाले आहे. हे हॉस्पिटल आपत्तीग्रस्तांना २४ तास मोफत वैद्यकीय सेवा पुरवत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. 

व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत अनुभवी डॉक्टरांचा समावेश असलेल्या भारतीय वैद्यकीय पथकाने काराकासमधील आंतरराष्ट्रीय ला रिनकोनाडा रेसट्रॅक येथे आपला कॅम्प स्थापित केला आहे. हा कॅम्प आता पूर्ण क्षमतेने सुरू झाला असून सर्व सेवा मोफत दिल्या जात आहेत.

शंभर वर्षांतील सर्वात भीषण भूकंप
व्हेनेझुएलामध्ये गेल्या बुधवारी संध्याकाळी ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन लागोपाठ शक्तिशाली भूकंप झाले होते. गेल्या १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधीत या भागात आलेले हे सर्वात शक्तिशाली भूकंप ठरले असून, संपूर्ण परिसरात याचे तीव्र झटके जाणवले होते. 

या विनाशकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या रविवारी १,४५० वर पोहोचली असून, हजारो लोक जखमी झाले आहेत तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. या कठीण काळात भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कर स्थानिक प्रशासनाच्या सोबतीने मदत कार्यात आघाडीवर आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या कामगिरीचे कौतुक
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, भारतीय लष्कराचे डॉक्टर भूकंप प्रभावित लोकांची अत्यंत काळजीपूर्वक सेवा करत आहेत. व्हेनेझुएलाचे उपआरोग्य मंत्री आणि कॅपिटल डिस्ट्रिक्ट प्रशासनाच्या प्रमुखांनी स्वतः या भारतीय फील्ड हॉस्पिटलला भेट देऊन कामाची पाहणी केली आणि भारताचे आभार मानले. 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही रविवारी स्पष्ट केले की, भारताने पाठवलेले मदत साहित्य, वैद्यकीय उपकरणे आणि फील्ड हॉस्पिटल युनिट व्हेनेझुएलात पोहोचले असून, यामुळे तेथील मदत कार्याला मोठी गती मिळाली आहे.

वायू दलाच्या विमानांची २३ तासांची उड्डाणे
या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलाच्या दोन सी-१७ ग्लोबमास्टर विमानांनी दिल्ली ते काराकास असा १४,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास अवघ्या २३ तासांच्या उड्डाणात पूर्ण केला. या विमानांमधून ६६ टन मदत सामग्री व्हेनेझुएलामध्ये पोहोचवण्यात आली आहे. 

यामध्ये भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलसह ३५ टनांपेक्षा जास्त औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि दोन भीष्म मोबाईल क्यूब्सचा समावेश आहे. 'भीष्म' क्यूब्स हे तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय उपचार देण्यासाठी डिझाइन केलेले फिरते रुग्णालय आहे. या संकटकाळात भारत व्हेनेझुएलाचे सरकार आणि तेथील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.