इस्त्राईल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत आपल्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत, मंगळवारी (२४ जून) इराणमधून २९२ भारतीय नागरिक विशेष विमानाने नवी दिल्लीत दाखल झाले. यासह, इराणमधून आतापर्यंत एकूण २२९५ भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. तसेच, इस्त्राईलमधूनही १६१ भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणले आहे.
दिल्लीत दाखल झालेल्या प्रवाशांचे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा यांनी स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी एक्स वरील पोस्टमध्ये सांगितले की, "ऑपरेशन सिंधूचा इस्त्राईल टप्पा २३ जून २०२५ रोजी सुरू झाला असून, १६१ भारतीय नागरिकांचा पहिला गट आज सकाळी ०८:२० वाजता अम्मान, जॉर्डनमार्गे नवी दिल्ली येथे सुखरूप पोहोचला. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे."
इराणमधून परतलेल्या नागरिकांनी भारताच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंजाबमधील बलजिंदर कौर, ज्या २१ वर्षांपासून इराणमध्ये हिंदी शिक्षिका म्हणून काम करत आहेत, त्यांनी सांगितले की, "आपला देश आपलाच आहे. तिथे (इराणमध्ये) आम्हाला कधीही अडचण आली नाही, पण गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती बदलली आहे. तरीही सरकार नागरिकांच्या पाठिशी उभे राहते याचा अभिमान वाटतो." नागपूरच्या झिवा जाफ्री यांनीही, "आमचे वेळापत्रक १९ जूनचे होते, जे रद्द झाले. आम्ही काळजीत होतो, पण इथे आल्याने आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे," असे सांगितले.
मध्यपूर्वेतील संघर्ष आणि 'ऑपरेशन सिंधू'
इस्त्राईल आणि इराणमधील संघर्ष १३ जून रोजी सुरू झाला, जेव्हा इस्त्राईलने इराणच्या लष्करी आणि अणु ठिकाणांवर 'ऑपरेशन रायझिंग लायन' नावाचा मोठा हवाई हल्ला केला. याला प्रत्युत्तर म्हणून, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ३' नावाचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र अभियान सुरू केले, ज्यात इस्त्राईलच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला.
तणाव आणखी वाढला, जेव्हा अमेरिकेने रविवारी पहाटे 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' अंतर्गत इराणच्या तीन प्रमुख अणु सुविधांवर अचूक हवाई हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली, यात कतारमधील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ असलेल्या अल उदयद एअर बेसचाही समावेश होता. या वाढत्या तणावामुळेच भारत सरकारने आपल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे. इस्त्राईलहून भारतात येण्यासाठी जमीन मार्ग आणि त्यानंतर विमान प्रवासाची सोय करण्यात आली आहे.