'भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानची जवळपास बारा ते तेरा विमाने पाडण्यात आली होती त्यामध्ये अमेरिकी बनावटीच्या 'एफ-१६' या विमानांचाही समावेश होता,' असे प्रतिपादन हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल अमरप्रीतसिंग यांनी केले. यातील सहा विमाने हवेत तर अन्य सहा हवाई तळावर नष्ट करण्यात आली, असे ते म्हणाले. तत्पूर्वी पाकिस्तानने मात्र भारताची विमाने पाडण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सिंग म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे नव्हे तर पाकने केलेल्या विनंतीनंतर शस्त्रसंधी झाली, असे सांगत सिंग म्हणाले की, 'पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांची हत्या केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हाती घेण्यात आले. पाकमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. साऱ्या जगाने तेव्हा भारतीय लष्कराची ताकद आणि भेदकपणा पाहिला. या मोहिमेअंतर्गत तीनशे किलोमीटर आतपर्यंत अचूक हल्ले करण्यात आले. सुमारे शंभर तास चाललेल्या या संघर्षात लष्कराने पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि असंख्य ड्रोन हवेतच नष्ट केले. बदला घेण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये यासाठी समन्वय ठेवण्यात आला होता.'
लष्कराच्या तिन्ही दलांकडून 'सुदर्शन चक्र' योजनेवर काम सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले. हवाई दलाची क्षमता यामुळे मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूर ही मोहीम कठोरपणे राबविण्यासाठी सरकारकडून लष्कराला स्पष्ट निर्देश मिळाले होते. भारतीय विमाने पाडण्यात आल्याचा दावा पाकने वारंवार केला. मात्र तेथील लोकांना सांगण्यासाठी त्यांनी मनोहर कथा रचल्या आहेत. त्यांना त्यांच्या विचारातच राहू द्या."
"दहशतवादी त्यांच्या जागा बदलत आहेत. भारतीय सीमेपासून दूर खैबर पख्तुनख्वा येथे त्यांनी तळ बनविला आहे. गुप्त माहिती मिळाली तर हे तळ देखील आम्ही उद्ध्वस्त करू. चीन आणि पाक यांचे आव्हान कायम राहणार आहे. त्यांच्या पातळीवर ते तयारी करत आहेत, आम्ही देखील तयारी करत आहोत. नवीन धावपट्ट्या बनविल्या जात आहेत. मात्र दरवर्षी आपल्याला ३० ते ४० नवीन विमाने तयार करावी लागतील. देशाच्या संरक्षण क्षेत्राचा एकंदर विचार केला तर आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही," अशी टिपणी सिंग यांनी केली.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, "ही दहशतवाद्यांविरोधात होती, ती कुणाही एका धर्माच्याविरोधात नव्हती. यातून आपल्या नागरिकांच्या संरक्षणाचा भारताचा निर्धार दिसून येतो. भविष्यात गरज भासल्यास भारत सीमा ओलांडून पुन्हा कारवाई करेल."
आणखी एका प्रणालीची खरेदी
जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असणारी 'एस-४००' ही आणखी एक क्षेपणास्त्र प्रणाली रशियाकडून खरेदी करण्याचा भारत सरकारचा विचार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान याच क्षेपणास्त्रांनी निर्णायक भूमिका पार पाडत पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्यात या क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीबाबत चर्चा होऊ शकते.