ऑपरेशन सिंदूर : अभूतपूर्व आणि अचूक वेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 13 h ago
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

पाकिस्तानात दहशतवादी तळांवर भारताने नुकतेच केलेले हल्ले राष्ट्रीय सुरक्षा धोरणाबाबत मैलाचे दगड ठरणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी बारकाईने आणि धैर्याने ही यशस्वी कारवाई करून दाखवली. या कारवाईतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादविरोधी लढाईत परिपक्व, मोजक्या पण ठोस दृष्टिकोन पुन्हा एकदा दिसून आला. 
  
पंतप्रधान आणि डोवाल यांच्यात झालेल्या अनेक बैठकींमुळे तीनही सेनादलांच्या एकत्रित कारवाईचा मार्ग मोकळा झाला. त्यात सुसूत्रता आली. या कारवाईत नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. हे हल्ले बेछूट नव्हते. दहशतवादी केंद्रे नष्ट करायची, मात्र नागरी नुकसान टाळायचे असा स्पष्ट हेतू या कारवाईमागे होता. 

नियोजन आणि रणनीती
या यशस्वी रणनीतीक कारवाईत ठाम राजकीय नेतृत्व आणि तज्ज्ञ नियोजनाचे महत्त्व पुन्हा एकदा  अधोरेखित झाले. गुप्तचर विभाग आणि दहशतवादविरोधी क्षेत्रात अनेक दशकांचा अनुभव असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या नियोजनात आणि अंमलबजावणीत मोलाची भूमिका बजावली. भारतीय उच्चायुक्त कार्यालयात आर्थिक सल्लागार म्हणून पाकिस्तानात काम करताना मिळालेली माहिती त्यांना याकामी उपयोगी पडली. कारवाईत महत्त्वाची लक्ष्ये ठरवताना या माहितीने आणि अनुभवाने मोलाची भूमिका बजावली. 

पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षा यंत्रणेला निर्णय घेण्याची पूर्ण स्वायत्तता आणि प्रभावीपणे काम करण्याची मुभा दिली होती. डोवाल यांच्या देखरेखीखाली ‘ऑपरेशन सिंदूर’ काळजीपूर्वक आखले गेले आणि यशस्वीपणे राबवले गेले. पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी पायाभूत सुविधांबाबत अनेक वर्षांपासून जमवलेली गुप्तचर माहिती यावेळी वापरली गेली. 

दहशतवादी तळांची माहिती
गुप्तचर विभागाचे माजी संचालक म्हणून काम पाहिलेल्या डोवाल यांनी दहशतवादी नेटवर्क कसे काम करतात याची सखोल माहिती यावेळी दिली. पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूर आणि मुरिदकेसारख्या भागातून हे नेटवर्क्स चालवले जातात. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांची मुख्यालये तिथे आहेत. या ठिकाणांना सीमेपलीकडील दहशतवादाची केंद्र असल्याचे निश्चित करण्यात आले. अलीकडेच खलिस्तानी दहशतवाद्यांनाही इथूनच चिथावणीचा दिली जात असल्याचे समोर आले होते. 

‘ऑपरेशन सिंदूर’चा परिणाम
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर 90 हून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातील प्रमुख दहशतवादी नेत्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. शत्रूच्या हद्दीत आतपर्यंत शिरून दहशतवादी नेटवर्क उखडून टाकण्यास भारत समर्थ असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला.  

भारताची नवी भूमिका
या कारवाईने दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांना भारताने कठोर संदेश दिला. भारताची रणनीतीने आता संयमाकडून ठाम प्रत्युत्तराकडे सरकली आहे. नागरी हानी टाळण्याचे भारताचे नैतिक धोरण यावेळीही कायम राहिले. हल्ले अचूक आणि केवळ दहशतवादी तळांपुरते मर्यादित ठेवले गेले. मात्र भारतीय सशस्त्र दलांनी नागरी लक्ष्यांवर हल्ला केल्याचा प्रचार पाकिस्तान करेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter