प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून एकूण १३३ मान्यवरांना नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दक्षिण भारतीय सुपरस्टार मम्मूट्टी यांना देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'पद्मभूषण' जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या यादीत ५ मुस्लीम मान्यवरांचा समावेश असून त्यांनी कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात दिलेले योगदान ऐतिहासिक मानले जाते.
या पुरस्कारांमध्ये भारतीय सिनेमाचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' देऊन गौरवण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातून क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना 'पद्मश्री' जाहीर झाला आहे. ७४ वर्षीय मोहम्मद कुट्टी पणपरम्बिल इस्माइल उर्फ मम्मूट्टी यांनी गेल्या पाच दशकांत मल्याळमसह तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी अशा ४०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या मम्मूट्टींना यापूर्वी २०२१ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्रीनेही सन्मानित केले होते.
राजस्थानच्या मेवात भागातील गफरुद्दीन मेवाती जोगी यांना कलेच्या क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' जाहीर झाला आहे. ते 'भपंग' या वाद्याचे मास्टर असून ६० वर्षांपासून 'पांडुन का कडा' (महाभारत) ही लोककला जिवंत ठेवत आहेत. हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या समन्वयाचे प्रतीक असलेल्या जोगी समुदायातील गफरुद्दीन यांना महाभारतातील २५०० हून अधिक श्लोक तोंडपाठ असून त्यांनी या भारतीय लोककलेला जागतिक ओळख मिळवून दिली आहे.
🇮🇳 सुपरस्टार मम्मूट्टी यांना 'पद्मभूषण' जाहीर. गफरुद्दीन जोगी आणि नुरुद्दीन अहमद यांच्यासह ५ मुस्लीम मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. @mammukka #PadmaAwards2026 #Mammootty #CommunalHarmony #AwazTheVoiceMarathi pic.twitter.com/miwbKE76hD
— Awaz - The Voice मराठी (@awaz_marathi) January 26, 2026
गुजरातमधील जुनागडचे प्रख्यात ढोलक वादक मीर हाजीभाई कसामभाई यांनाही 'पद्मश्री'ने सन्मानित करण्यात आले आहे. 'हाजी रामकडू' या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कलाकाराने आपल्या कारकिर्दीत १००० हून अधिक स्टेज शो केले असून ३००० हून अधिक कार्यक्रम केवळ गोशाळा आणि सामाजिक कार्यासाठी विनामूल्य केले आहेत. भजन, गझल आणि कव्वाली या तिन्ही प्रकारांत त्यांचे प्रभुत्व असून त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ ही कला जोपासली आहे.
आसाममधील सर्वात अनुभवी शिल्पकार आणि दृश्य कलाकार नुरुद्दीन अहमद यांना 'पद्मश्री' देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी ४००० हून अधिक नाटकांच्या सेटचे डिझाइन केले असून आसामच्या 'मोबाईल थिएटर' चळवळीला आधुनिक रूप दिले आहे. १९७५ मध्ये लखीमपूरला गेल्यानंतर त्यांनी पहिली दुर्गा मूर्ती साकारली होती. त्यांनी डॉ. भूपेन हजारिका आणि गोपीनाथ बारडोलोई यांसारख्या महापुरुषांचे भव्य पुतळेही साकारले असून त्यांना यापूर्वी साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
काश्मीरमधील प्रख्यात साहित्यिक, कवी आणि भाषाशास्त्रज्ञ प्रा. शफी शौक़ यांना शिक्षण आणि साहित्यातील योगदानासाठी 'पद्मश्री' मिळाला आहे. काश्मीर विद्यापीठात तीन दशकांहून अधिक काळ अध्यापन करणाऱ्या शौक़ यांनी इंग्रजी आणि काश्मिरी भाषेत डझनभर पुस्तके, शब्दकोश आणि व्याकरणाचे ग्रंथ लिहिले आहेत. पाच दशकांहून अधिक काळ काश्मिरी साहित्याची सेवा करणाऱ्या शौक़ यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, समाजात बदल घडवणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आपले नाव असणे ही अभिमानास्पद बाब आहे.