पाकिस्तानच्या हेरगिरी नेटवर्कचा 'असा' झाला पर्दाफाश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या किमान अकरा जणांना तपास यंत्रणांनी तीन राज्यांतून मागील काही दिवसांत अटक केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विविध पातळ्यांवर तपास सुरू असताना युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'साठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणानंतर तपास यंत्रणा अधिक सावध झाल्या असून देशभरात झडती सत्र सुरू आहे. 

'पाकिस्तानकडून युवा युट्यूबरसह अन्य लोकांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात असून, सहज पैसा मिळत असल्याने हे लोकही त्याकडे आकर्षित होत आहेत आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला देत आहेत,' असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. 

ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला तपास यंत्रणांनी नुकतीच अटक केली आहे. ३३ वर्षीय ज्योतीने भारतीय लष्कराशी निगडित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यानंतर सावध झालेल्या तपास यंत्रणांनी पतियाळा येथील खालसा महाविद्यालयात शिकणाऱ्या दवेंदरसिंग ढिल्लन या २५ वर्षीय युवकालादेखील १२ मे रोजी हरियानामधील कैथल येथून अटक केली. दवेंदर हा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये पाकिस्तानला गेला होता आणि तेथे त्याने 'आयएसआय'च्या काही अधिकाऱ्यांना देशातील गोपनीय माहिती दिल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. 

हरियाना येथील नौमान इलाही यालाही पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. २४ वर्षीय नौमान हा हरियाना येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. नौमान हा गोपनीय माहिती इस्लामाबादला पाठवत असे आणि त्याबदल्यात त्याच्या मेव्हण्याच्या खात्यात पाकिस्तानकडून पैसे येत असत, असे तपासात उघड झाले आहे. 

नूह येथून दोघे ताब्यात 
हरियानामधील नूह येथील अरमान हा २३ वर्षीय युवक, भारत-पाकमध्ये तणाव असताना, संरक्षणाशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवत होता, अशी माहिती तपास संस्थांनी दिली. अरमान याला पोलिसांनी हेरगिरी प्रकरणी १६ मे रोजी अटक केली असून, या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. नूह येथूनच तारीफ या युवकालादेखील हेरगिरी प्रकरणी अटक केली असून, तोदेखील पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. 

गुजरात पोलिसांकडून कारवाई 
पंजाबमधील जालंदर येथून महंमद मुर्तुझा अली या व्यक्तिला गुजरात पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. तो 'आयएसआय'च्या संपर्कात असल्याचे पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले आहे. त्याचप्रमाणे पंजाबमधूनच गझाला या महिलेला आणि यामिनी महंमद यालाही हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या दोघांना अटक 
पंजाबमधील सुखप्रितसिंग आणि करणबीर सिंग या दोघांना १५ मे रोजी हेरगिरीप्रकरणी अटक केल्याची माहिती सोमवारी पंजाब पोलिसांनी दिली. हे दोघेही ऑपरेशन सिंदूरशी निगडित गोपनीय माहिती 'आयएसआय'ला पुरवत होते असे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला लष्कराच्या हालचाली आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती पुरविल्याचे तपासातून उघड झाले आहे.

उत्तर प्रदेशातील उद्योजकाला अटक 
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील उद्योजक शहजाद बाला मुरादाबाद येथून रविवारी (ता. १८) अटक करण्यात आली. शहजाद याने अनेकदा पाकिस्तानला भेट दिल्याचे तपासात उघड झाले असून, पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविण्याबरोबरच तो सौंदर्यप्रसाधने, कपडे आणि मसाल्यांची तस्करी करत होता. याशिवाय, मागील महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत हजरतपूर येथील दारूगोळा कारखान्यात चार्जमन म्हणून काम करणाऱ्या रवींद्र कुमार याला अटक केली. तो 'फेसबुक'च्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात आला असल्याचे तपासात उघड झाले आहे.