जनतेच्या मनातील पोलिसांची इमेज बदलणे अत्यावश्यक - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
'अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदे'त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
'अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदे'त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० नोव्हेंबर) देशातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित करताना एक महत्त्वाची सूचना केली आहे. "पोलिसांबद्दलची लोकांची धारणा (Public Perception) बदलण्याची तातडीने गरज आहे. विशेषतः तरुणांमध्ये पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी व्यावसायिकता, संवेदनशीलता आणि तत्परता वाढवली पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी रायपूर येथे आयोजित ६० व्या 'अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदे'त बोलत होते. या परिषदेची थीम 'विकसित भारत: सुरक्षेचे आयाम' अशी होती.

सुरक्षेसाठी नवे मॉडेल

पंतप्रधानांनी बंदी घातलेल्या संघटनांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा उभारण्यावर भर दिला. तसेच, डाव्या उग्रवादापासून (नक्षलवादापासून) मुक्त झालेल्या भागांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे आणि सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी नाविन्यपूर्ण मॉडेल्स स्वीकारणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन आणि 'दितवाह' चक्रीवादळ

सध्याच्या 'दितवाह' (Ditwah) चक्रीवादळाच्या परिस्थितीचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी पोलीस प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. चक्रीवादळे, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि नुकसान कमी करण्यासाठी 'प्रोॲक्टिव्ह' नियोजन, रिअल-टाइम समन्वय आणि तत्पर प्रतिसादाची गरज आहे. यासाठी "संपूर्ण सरकारने एकत्र येऊन (Whole-of-Government approach) काम करणे आवश्यक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

अमली पदार्थांविरुद्ध लढा

अमली पदार्थांच्या समस्येचा सामना करण्यासाठीही त्यांनी अशाच एकत्रित प्रयत्नांचे आवाहन केले. अंमलबजावणी, पुनर्वसन आणि सामाजिक स्तरावरील हस्तक्षेप यांना एकत्र आणूनच या संकटावर मात करता येईल, असे ते म्हणाले.

शहरी पोलीस आणि नवीन कायदे

पंतप्रधानांनी शहरी पोलीस व्यवस्था बळकट करणे आणि पर्यटक पोलिसांना (Tourist Police) पुन्हा सक्रिय करण्यावर भर दिला. तसेच, वसाहतकाळातील जुन्या कायद्यांच्या जागी आलेल्या 'भारतीय न्याय संहिता', 'भारतीय साक्ष अधिनियम' आणि 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' या नवीन कायद्यांबद्दल जनतेत जागरूकता वाढवण्याचे निर्देश दिले.

तंत्रज्ञान आणि फॉरेन्सिक

निर्मनुष्य बेटांना सुरक्षेच्या कक्षेत आणण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे राबवण्यास त्यांनी सांगितले. 'नॅटग्रीड' (NATGRID) अंतर्गत एकत्रित केलेल्या डेटाबेसचा प्रभावी वापर करावा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने त्यातून उपयुक्त माहिती मिळवावी, असा सल्ला त्यांनी दिला. विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी पोलीस तपासात फॉरेन्सिकच्या वापराचा अभ्यास करावा, ज्यामुळे फौजदारी न्याय व्यवस्था अधिक बळकट होईल, असेही ते म्हणाले.

भविष्याचा रोडमॅप

ही परिषद 'इंटेलिजन्स ब्युरो'ने (IB) आयोजित केली होती. यात 'व्हिजन २०४७' कडे जाणारा पोलीसिंगचा दीर्घकालीन रोडमॅप, दहशतवाद आणि कट्टरतावादाचा मुकाबला, महिला सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि परदेशातील भारतीय गुन्हेगारांना परत आणण्याची रणनीती यावर सखोल चर्चा झाली.

पंतप्रधानांनी पोलीस नेतृत्वाला आवाहन केले की, त्यांनी आपली कार्यपद्धती अशा प्रकारे बदलावी की ती विकासाच्या वाटेवर असलेल्या राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करेल.

यावेळी पंतप्रधानांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांना 'राष्ट्रपती पोलीस पदक' प्रदान केले. तसेच, शहरी पोलीसिंगमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा करणाऱ्या तीन सर्वोत्तम शहरांचा गौरव करण्यात आला. शहरी पोलीसिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार पहिल्यांदाच सुरू करण्यात आला आहे.

या परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन उपस्थित होते. सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक (DGPs) आणि महानिरीक्षक (IGPs) प्रत्यक्ष हजर होते, तर देशभरातून ७०० हून अधिक अधिकारी आभासी पद्धतीने (Virtually) सहभागी झाले होते.