'आकाश ही मर्यादा नव्हे तर सुरुवात आहे', पंतप्रधानांचा युवा खगोलशास्त्रज्ञांना संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे १८ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला संबोधित केले. ६४ देशांमधून आलेल्या ३०० हून अधिक युवा सहभागींचे भारतात स्वागत करताना, पंतप्रधानांनी भारताच्या वैज्ञानिक वारशाची आणि भविष्यातील ध्येयांची ओळख करून दिली.

"भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो," असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या प्राचीन खगोलशास्त्रीय परंपरेचा उल्लेख केला. त्यांनी ५ व्या शतकातील महान गणितज्ञ-खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते हे सर्वप्रथम सांगितले. "त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!" असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

भारताच्या आधुनिक वैज्ञानिक प्रगतीवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, "आपल्याकडे लडाखमध्ये जगातील सर्वात उंच खगोलशास्त्रीय वेधशाळांपैकी एक असून ती समुद्रसपाटीपासून ४,५०० मीटर उंचीवर आहे, जणू ताऱ्यांशी हस्तांदोलन करण्याइतपत जवळ!" त्यांनी पुण्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT), चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी लँडिंग आणि सूर्याच्या अभ्यासासाठी असलेल्या आदित्य-एल१ मोहिमेचाही उल्लेख केला.

वैज्ञानिक जिज्ञासा जोपासण्यासाठी आणि तरुण मनांना सक्षम करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून १ कोटींहून अधिक विद्यार्थी STEM संकल्पना शिकत आहेत. तसेच, 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजनेमुळे लाखो विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्स मोफत उपलब्ध होत आहेत. STEM क्षेत्रात महिलांच्या सहभागात भारत जगात आघाडीवर असल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

पंतप्रधानांनी युवा संशोधकांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. ते म्हणाले, "विश्वाचा धांडोळा घेत असताना आपण हे देखील विचारले पाहिजे की, अवकाशविज्ञान पृथ्वीवरील लोकांचे जीवन कसे सुधारू शकते?" शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज, नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना आणि दुर्गम भागांसाठी उत्तम संवाद व्यवस्था निर्माण करण्यासाठी अवकाश विज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

"भारत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या शक्तीवर विश्वास ठेवतो आणि हे ऑलिंपियाड तीच भावना प्रतिबिंबित करते," असे सांगत त्यांनी या आयोजनाबद्दल होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे आभार मानले. "लक्षात ठेवा, भारतात आम्ही मानतो की आकाश ही मर्यादा नाही, ती फक्त सुरुवात आहे!" या प्रेरणादायी संदेशाने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.