सोने खरेदी, परदेशवारी वर्षभरासाठी पुढे ढकला; वर्क फ्रॉम होम करा - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पश्चिम आशियातील संघर्षाच्या दुष्परिणामांपासून जनतेचे रक्षण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी इंधनाचा जपून वापर करा. तसेच सोने खरेदी आणि परदेशवारी काही काळ पुढे ढकला, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

तेलंगणा भाजपने येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. पश्चिम आशियातील संकटामुळे परकीय चलन वाचवण्याची मोठी गरज आहे. त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा. शहरांमध्ये मेट्रोचा वापर, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा. पार्सल पाठवण्यासाठी रेल्वेचा वापर करावा आणि घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

सोने खरेदी पुढे ढकलण्याचे आवाहन

या संकटामुळे परकीय चलन वाचवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी सोने खरेदी आणि परदेशवारी एका वर्षासाठी पुढे ढकलावी, असे मोदी म्हणाले.

"आपल्याला कोणत्याही परिस्थितीत परकीय चलन वाचवावेच लागेल," असे ते म्हणाले. पश्चिम आशियातील संघर्षामुळे पेट्रोल आणि खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पुरवठा साखळीवर दबाव येतो, तेव्हा परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना करूनही अडचणी वाढतात. म्हणूनच जागतिक संकटाच्या काळात देशाला सर्वोपरी ठेवून आपण काही संकल्प केले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-१९ च्या काळात आपण वर्क-फ्रॉम-होम, व्हर्च्युअल मीटिंग्ज आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या अनेक पद्धतींचा अवलंब केला होता. आपल्याला त्याची सवयही झाली होती. आता पुन्हा त्याच पद्धती सुरू करण्याची काळाची गरज आहे, असे मोदी म्हणाले.

परकीय चलन वाचवण्यासाठी आणि देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी आणखी काही उपाय सुचवले. खाद्यतेलाचा वापर कमी करणे, रासायनिक खतांचा वापर टाळणे आणि नैसर्गिक शेती व स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमधील विजयाचा संदर्भ

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे बहुमत मिळाले आहे. तसाच उत्साह मला तेलंगणामध्येही दिसत आहे. तेलंगणाच्या जनतेलाही आता बदल हवा आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव केला, म्हणूनच आज देशभरात जल्लोष सुरू आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी सभेमध्ये 'अगली बार' अशी घोषणा दिली. तेव्हा उपस्थितांनी 'भाजप सरकार' असा जोरदार प्रतिसाद दिला.

तेलंगणाने सुरुवातीच्या काळात पक्षाला दिलेल्या योगदानाची आठवण मोदींनी करून दिली. भाजपचे फक्त दोन खासदार होते, तेव्हा या राज्याने एक खासदार दिला होता, असे ते म्हणाले.

काँग्रेसवर जोरदार टीका

त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. जनतेची सेवा करण्याऐवजी फूट पाडणारे आणि द्वेषाचे राजकारण करणे हे काँग्रेसचे प्राधान्य आहे. काँग्रेस आता डाव्यांपेक्षाही अधिक डावी झाली आहे, म्हणजेच ती पूर्णपणे माओवादी बनली आहे. ती मुस्लिम लीगपेक्षाही जास्त 'मुस्लिम लीगसारखी' झाली आहे, असा घणाघात त्यांनी केला. लोक आता काँग्रेसला 'एमएमसी' (MMC- मुस्लिम लीग, माओवादी, काँग्रेस) असे म्हणतात, असा दावा मोदींनी केला.

देशात माओवाद आता शेवटच्या घटका मोजत आहे. पण काँग्रेस आणि डावे पक्ष त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या ११-१२ वर्षांत माओवादी दहशतीवर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या शाही कुटुंबाने सतत प्रयत्न केले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

तेलंगणा पोलिसांना जर मोकळीक दिली असती, तर केंद्राच्या धोरणांशी समन्वय साधून माओवादी हिंसाचार याआधीच संपुष्टात आला असता, असेही मोदी म्हणाले. सत्तेत येण्यासाठी काँग्रेस मोठी आश्वासने देते आणि नंतर ती विसरून जाते, असा आरोप त्यांनी केला.

आपल्या हैदराबाद दौऱ्यात पंतप्रधानांनी सिंधू रुग्णालयाचे उद्घाटन केले. हे रुग्णालय म्हणजे शहर आणि परिसरातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी एक चांगला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. रुग्णालयाच्या टीमने अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण गोष्टींवर भर दिला आहे, त्याचे मोदींनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये कौतुक केले.