पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीतील 'सेवा तीर्थ' येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची (Council of Ministers) एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या वर्षातील मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक असून यामध्ये आगामी काळातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Reshuffle) प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज दुपारी ४:३० वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला सर्व कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि इतर सर्व राज्यमंत्री उपस्थित राहणार असून ही बैठक चार ते पाच तास चालण्याची शक्यता आहे.
मंत्रालयांच्या कामगिरीचा आढावा आणि सुधारणांवर भर
या महत्त्वपूर्ण बैठकीत सरकारच्या विविध मंत्रालयांचे कामकाज, त्यांनी घेतलेले प्रमुख निर्णय आणि त्यांचे परिणाम यावर सविस्तर चर्चा होणार आहे. सर्व मंत्रालयांनी गेल्या दोन वर्षांत राबवलेल्या सुधारणा उपायांचा अहवाल कॅबिनेट सचिवालयाकडे यापूर्वीच सुपूर्द केला आहे. याशिवाय, सर्व मंत्रालयांना गेल्या १२ वर्षांत यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या योजनांची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ९ जून रोजी मोदी सरकारला सत्तेत १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारच्या कामगिरीचा एक सर्वसमावेशक अहवालही या बैठकीत सादर केला जाणार आहे.
जागतिक संकट आणि देशांतर्गत धोरणांवर चर्चा
पंतप्रधान मोदी या बैठकीत सध्या सुरू असलेल्या मध्य पूर्व (Middle East) संकट आणि इराण युद्धाच्या भारतावरील आर्थिक परिणामांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. जागतिक संकटामुळे ऊर्जा क्षेत्रातील किमती आणि व्यापारी देवाणघेवाणीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ते विविध मंत्रालयांना आवश्यक निर्देश देऊ शकतात.
यासोबतच ऊर्जा, कृषी, खते, विमान वाहतूक, नौवहन आणि लॉजिस्टिक यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील सुधारणांवर या बैठकीत चर्चा केली जाईल. अलीकडेच पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर होत असलेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.