Defence Investiture Ceremony: राष्ट्रपती भवनात शौर्याचा सन्मान; लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शूरवीरांना गॅलंट्री अवॉर्ड्स प्रदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कारांसाठी आयोजित 'संरक्षण सन्मान सोहळा-२०२६' (पहिला टप्पा) दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर मान्यवर.
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कारांसाठी आयोजित 'संरक्षण सन्मान सोहळा-२०२६' (पहिला टप्पा) दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर मान्यवर.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी सशस्त्र दलातील जवानांना त्यांच्या अजोड शौर्य आणि कर्तव्याप्रती असलेल्या समर्पणासाठी सात 'कीर्ती चक्र' प्रदान करण्यात आले. यामध्ये देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या दोन जवानांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात आयोजित 'डिफेन्स इन्व्हेस्टिचर सेरेमनी'च्या (Defence Investiture Ceremony) पहिल्या टप्प्यात हे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

गगनयात्री आणि नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांचा सन्मान

भारताचा दुसऱ्या सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार असलेल्या 'कीर्ती चक्रा'ने हवाई दलाचे (IAF) पायलट आणि 'गगनयात्री' एअर कमोडोर प्रशांत बालकृष्णन नायर यांना सन्मानित करण्यात आले. यासोबतच नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांना 'शौर्य चक्र' प्रदान करण्यात आले. 'नाविका सागर परिक्रमा-२' मोहिमेत या दोघींनी खवळलेल्या समुद्रात २५,६०० नॉटिकल मैलांचा प्रवास पूर्ण करून 'पॉईंट निमो' (Point Nemo) गाठणाऱ्या पहिल्या भारतीय होण्याचा बहुमान मिळवला होता.

२९ शौर्य आणि १५ वीर चक्रांचे वितरण

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या समारंभात ७ कीर्ती चक्रांव्यतिरिक्त (२ मरणोत्तर), १५ वीर चक्र (३ मरणोत्तर) आणि २९ शौर्य चक्र (१ मरणोत्तर) संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलिसांच्या जवानांना प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय रायफल्सचे लान्स नाईक मीनाक्षी सुंदरमा, पॅरा स्पेशल फोर्सेसचे नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा, आसाम रायफल्सचे मेजर अर्शदीप सिंग आणि कॅप्टन लालरिनावमा सायलो यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले. तर, महार रेजिमेंटचे शिपाई जंजाळ प्रवीण प्रभाकर आणि सिक्कीम स्काऊट्सचे लेफ्टनंट शशांक तिवारी यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले.

दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या शूरवीरांना शौर्य चक्र

राष्ट्रपती भवनाने सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो आणि माहिती शेअर केली आहे. यामध्ये मेजर अंशुल बालटू यांना एप्रिल २०२५ मधील आसाममधील कारवाईसाठी, तर मेजर लेशान्थेम दीपक सिंग यांना अपहृत नागरिकाची सुटका करत दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल शौर्य चक्र देण्यात आले. तसेच जुलै २०२४ मध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) तीन परदेशी दहशतवाद्यांना ठार करणाऱ्या शिख रेजिमेंटच्या लेफ्टनंट कर्नल नीतेश भारती शुक्ला यांनाही शौर्य चक्राने गौरवण्यात आले आहे.