पुणेकरांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी बुधवारी (२७ नोव्हेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील (Phase-2) विस्तारीकरणाअंतर्गत दोन नवीन मार्गिकांना (Corridors) मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारे ३१.६३६ किलोमीटर लांबीचे नवीन मेट्रो जाळे निर्माण होणार आहे.
या प्रकल्पासाठी ९,८५७.८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तो पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापूर्वी याच टप्प्यातील लाईन २ए आणि लाईन २बी ला मंजुरी मिळाली होती. आता या नव्या मंजुरीमुळे पुणे मेट्रोचे एकूण जाळे १०० किलोमीटरच्या पुढे जाणार आहे.
दोन नवीन मार्गिका कोणत्या?
मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या दोन मार्गिकांमध्ये 'लाईन ४' आणि 'लाईन ४ए' यांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गांवर मिळून एकूण २८ उन्नत स्थानके (Elevated Stations) असतील.
१. लाईन ४ (खराडी – हडपसर – स्वारगेट – खडकवासला): हा मार्ग शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणार आहे. यामुळे खराडी आयटी पार्क आणि हडपसरची औद्योगिक वसाहत थेट खडकवासल्याच्या पर्यटन पट्ट्याशी जोडली जाईल.
२. लाईन ४ए (नळ स्टॉप – वारजे – माणिकबाग): हा मार्ग कर्वे रोड आणि सिंहगड रोड परिसरातील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
कसा असेल निधी आणि अंमलबजावणी?
या प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय संस्थांच्या कर्जातून संयुक्तपणे केला जाईल. या प्रकल्पाची अंमलबजावणी 'महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड' (महा-मेट्रो) कडे सोपवण्यात आली आहे. महा-मेट्रोने यापूर्वीच टोपोग्राफिकल सर्वेक्षण आणि डिझाइनची कामे सुरू केली आहेत.
कनेक्टिव्हिटी वाढणार, कोंडी फुटणार
सरकारी निवेदनानुसार, हे नवीन मार्ग पुण्याच्या 'सर्वसमावेशक गतिशीलता योजनेचा' (Comprehensive Mobility Plan) भाग आहेत. हे मार्ग खराडी बायपास, नळ स्टॉप आणि स्वारगेट येथे सध्या सुरू असलेल्या आणि मंजूर असलेल्या मेट्रो लाईन्सशी अखंडपणे जोडले जातील.
"नवीन मार्गिकांमुळे हडपसर रेल्वे स्टेशनवर इंटरचेंजची सुविधा मिळेल. तसेच, भविष्यात लोणी काळभोर आणि सासवड रोडकडे जाणाऱ्या विस्ताराशीही हे मार्ग जोडले जातील. यामुळे मेट्रो, रेल्वे आणि बस सेवांमध्ये प्रवाशांना सहज बदल करता येईल," असे निवेदनात म्हटले आहे.
सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड आणि मुंबई-बंगळुरू महामार्ग यांसारख्या प्रमुख रस्त्यांवरून हे मार्ग धावतील. यामुळे पुण्याच्या सर्वात जास्त रहदारीच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व प्रदूषणमुक्त प्रवासाला चालना मिळेल.
प्रवासी संख्येचा अंदाज
सरकारने या मार्गांवरील प्रवासी संख्येचे (Ridership) अंदाजही वर्तवले आहेत:
एकूण प्रवासी: २०२८ मध्ये दोन्ही मार्गांवरून मिळून दररोज ४.०९ लाख प्रवासी प्रवास करतील. ही संख्या २०३८ मध्ये ७ लाखांपर्यंत, २०४८ मध्ये ९.६३ लाखांपर्यंत आणि २०५८ मध्ये ११.७ लाखांपर्यंत वाढेल.
खराडी-खडकवासला: या एका मार्गावर २०२८ मध्ये ३.२३ लाख प्रवासी अपेक्षित असून, २०५८ पर्यंत ही संख्या ९.३३ लाखांवर जाईल.
नळ स्टॉप-माणिकबाग: या मार्गावर २०२८ मध्ये ८५,५५५ प्रवासी असतील, जे २०५८ पर्यंत २.४१ लाखांवर पोहोचतील.
या निर्णयामुळे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला मोठी गती मिळणार असून, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अंतर कमी होणार आहे.