तेहरान/वॉशिंग्टन
इराणमधील अयातुल्ला अली खमेनेई सरकारविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाने आता अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. शनिवारी रात्री राजधानी तेहरानसह देशातील १८० शहरांमध्ये सरकारविरोधी घोषणांनी रस्ते दुमदुमले. सरकारने इंटरनेट पूर्णपणे बंद केले असून आंदोलकांना चिरडण्यासाठी कडक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये हस्तक्षेपाचा इशारा दिल्यानंतर आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी जमवाजमव सुरू झाली असून अमेरिकेचे हवाई हल्ले कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून, म्हणजेच २८ डिसेंबर २०२५ पासून इराणमध्ये हे आंदोलन सुरू आहे. चलनाची झालेली घसरण आणि वाढत्या आर्थिक संकटामुळे व्यापारी आणि तरुणांनी सुरू केलेले हे आंदोलन आता सत्तापरिवर्तनाच्या मागणीपर्यंत पोहोचले आहे. 'ह्युमन राइट्स अॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सी'च्या अहवालानुसार, आतापर्यंत सुरक्षा दलांच्या कारवाईत किमान ११६ आंदोलकांचा मृत्यू झाला असून २,६०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
इराणचे निर्वासित राजपुत्र रेझा पहलवी यांनी आंदोलकांचे कौतुक करत त्यांना शहरांचे केंद्र काबीज करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर उत्तर तेहरानमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असून 'हुकूमशाहीचा अंत व्हावा' अशा घोषणा दिल्या जात आहेत.
आंदोलन दडपण्यासाठी इराण सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सरकारी वकील अली सालेही यांनी आंदोलकांना इशारा दिला आहे की, जे देवाबिरुद्ध युद्ध पुकारतील त्यांना फाशीच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालीबाफ यांनीही आंदोलकांना कठोर शिक्षा देण्याचे संकेत दिले असून क्रांतिकारक दलाच्या (IRGC) कारवाईचे समर्थन केले आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील जनतेला 'स्वातंत्र्य' हवे असल्याचे सांगत अमेरिकन हस्तक्षेपाचे संकेत दिले आहेत. माजी अमेरिकन लष्करी अधिकारी आणि विश्लेषकांच्या मते, अमेरिकेने तेहरानमधील लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले करण्याची योजना तयार केली आहे. आखाती देशांमधील लष्करी हालचाली पाहता हे हल्ले अटळ असल्याचे मानले जात आहे.
अमेरिकेच्या धमक्यांना इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. "जर अमेरिकेने कोणतीही आगळीक केली, तर अमेरिका आणि इस्रायल हे आमचे कायदेशीर लक्ष्य असतील," असा इशारा इराणच्या संसद अध्यक्षांनी दिला आहे. इराणच्या संसदेत 'अमेरिका मुदाबाद' (Death to America) च्या घोषणाही देण्यात आल्या. खमेनेई यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, इतिहासातील इतर हुकूमशहाप्रमाणेच ट्रम्प यांचाही लवकरच पतन होईल.
सध्या इराणमध्ये संपूर्ण इंटरनेट ब्लॅकआउट असून जगाचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेची लष्करी कारवाई झाल्यास आखातात मोठे युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.