ATS ची पुण्यात मोठी कारवाई! सॉफ्टवेअर इंजिनियरला अल-कायदा कनेक्शनप्रकरणी अटक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यात एक मोठी कारवाई करत एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली आहे. या ३४ वर्षीय व्यक्तीचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदा (Al-Qaeda) शी संबंध असल्याचा संशय असून, त्याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्या (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता. तो अल-कायदाच्या विचारसरणीने प्रभावित झाला होता आणि 'अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट' (AQIS) या संघटनेच्या संपर्कात होता, असा संशय आहे.

गुप्त माहितीच्या आधारे एटीएसने सोमवारी रात्री उशिरा या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता, काही आक्षेपार्ह साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तो सोशल मीडिया आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून अल-कायदाचा प्रचार करत होता आणि तरुणांना या संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होता, असा एटीएसला संशय आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएस आता त्याच्या संपर्कांचा आणि अल-कायदाच्या भारतातील नेटवर्कचा अधिक तपास करत आहे. या अटकेमुळे पुण्यासारख्या शहरातही दहशतवादी संघटनांचे जाळे पसरले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.