देशातील ५५३ रेल्वे स्थानकांचे पुनर्विकास, १५८५ उड्डाणपूल आणि अंडरपासचे लोकार्पण

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 5 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

देशातील तीनशेपेक्षा जास्त जिल्ह्यांतील ५५३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आली. याशिवाय रेल्वे स्थानक परिसरातील १५८५ उड्डाणपूल आणि अंडरपासचे लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

रेल्वेशी संबंधित दोन हजारांपेक्षा अधिक योजनांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. 'रालोआ-३' सरकारचा कार्यकाळ पुढील जून महिन्यापासून सुरु होणार आहे. मात्र ज्या प्रमाणात आणि वेगाने काम सुरु आहे ते आश्चर्यजनक आहे. या सर्व प्रकल्पांसाठी ४१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोमती नगर रेल्वे स्थानकाचे उ‌द्घाटन देखील करण्यात आले. दशकभरापूर्वी 'वंदे भारत' आणि 'नमो भारत' सारख्या आधुनिक आणि शानदार रेल्वेगाड्यांची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र हे स्वप्न साकार झाले आहे. त्याप्रमाणे आगामी काळात अमृत भारत रेल्वे स्थानके नागरिकांना पहावयास मिळणार आहेत, असे मोदी म्हणाले.

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी सुमारे १९ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. फूटओवर ब्रीज, कॉनकोर्स, वाढीव प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग, दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा, प्रकाश व्यवस्था, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, संकेत आणि दिशानिर्देश फलके, ट्रेन डिस्प्ले, सौंदर्याकरण, फूडकोर्ट अशा विविध प्रकारच्या सोयी सुविधा प्रवाशांना रेल्वे स्थानकांमध्ये मिळणार आहेत.

राज्यातील १२३ स्थानके
महाराष्ट्रातील १२३ स्थानकांचा समावेश अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेत करण्यात आला आहे. यात अकोला, नगर, अंधेरी, छत्रपती संभाजीनगर, वांद्रे टर्मिनस, बारामती, बेलापूर, भोकर, बोरिवली, भायखळा, चाळीसगाव, चंद्रपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचवड, दादर, दौंड, धामणगाव, धुळे, दिवा, गोंदिया, हडपसर, हातकणंगले, नांदेड, हिंगोली, इगतपुरी, जालना, कल्याण, कांजूरमार्ग, कराड, किनवट, कोल्हापूर, कोपरगाव, कुडुवाडी, कुर्ला, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद, लोणावळा, लोअर परेल, मालाड, मलकापूर, मनमाड, मरिन लाइन्स, मिरज, मुदखेड, मुंबई सेंट्रल, मुर्तजापूर, नागपूर, नाशिक रोड, धाराशिव, पाचोरा, पंढरपूर, परभणी, परळ, परळी वैजनाथ, पुलगाव, पुणे, साईनगर शिर्डी, सांगली, सातारा, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजीनगर पुणे, सोलापूर, तळेगाव, ठाणे, टिटवाळा, तुमसर रोड, उरळी, विक्रोळी, वर्धा, वाशिम, वाठार या स्थानकांचा समावेश आहे.