काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्करी ताफ्यावर हल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असून कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर आज केलेल्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले, तर सहा जवान जखमी झाले. जवानांनी प्रत्युत्तर देताच दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. जवानांनी पाठलाग केल्यानंतर जंगलात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. कथुआ जिल्ह्यात मागील दोन दिवसांत दहशतवाद्यांबरोबरील ही तिसरी चकमक असून महिनाभरातील हा दुसरा मोठा हल्ला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर आणि जम्मू-काश्‍मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्या तरीही जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. शनिवारी रात्री कथुआ जिल्ह्यातील दोन गावांमध्ये झालेल्या चकमकींमध्ये दोन जवानांना वीरमरण आले होते. यामध्ये सहा दहशतवादीही मारले गेले होते. या घटनेचा तपास सुरू असतानाच आज लोहाई मल्हार भागातील मचेदी-किंदली-मल्हार रस्त्यावरून लष्कराचे जवान गस्तीसाठी जात असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गाडीवर अचानक हल्ला केला. त्यांनी बाँबफेक करत बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले, तर सहा जण जखमी झाले. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना तातडीने प्रत्युत्तर दिले. यामुळे दहशतवादी जंगलामध्ये पळून गेले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा दहशतवादी आणि जवान यांच्यात चकमक सुरू होती. दहशतवाद्यांना शोधून मारण्यासाठी अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. हे दहशतवादी काही दिवसांपूर्वीच घुसखोरी करून आले असण्याची शक्यता सुरक्षा दलांनी वर्तविली आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असून येथील वातावरण अस्थिर करण्याचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा प्रयत्न असल्याचे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. त्यामुळेच घुसखोरीचे आणि दहशतवाद्यांच्या कारवायांचे प्रमाण वाढले असल्याचे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे.

महिनाभरातील दुसरा हल्ला
कथुआ जिल्ह्यातच महिनाभरात झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. नऊ जून रोजी दहशतवाद्यांनी रिआसी जिल्ह्यामध्ये पर्यटकांच्या बसवर केलेल्या हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून नऊ भाविकांचा मृत्यू झाला होता. १२ आणि १३ जून रोजी एका शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते, तर सीमा सुरक्षा दलाचा एक जवान हुतात्मा झाला होता. त्यानंतर २६ जूनला दोडा जिल्ह्यातही चकमक झाली होती. यात तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.