मोदी युग म्हणजे विकास व मानवतावादाचा अनोखा संगम

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 10 Months ago
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

 लेखक - रामनाथ कोविंद

सौजन्य - सकाळ मीडिया 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात सर्वच क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडले असून भारताच्या आर्थिक वृद्धी आणि विकासाची घोडदौड विनाअडथळा सुरूच आहे. भारतामध्ये होत असलेल्या या अनुकूल परिवर्तनाचा मी सुद्धा एक साक्षीदार राहिलो आहे. या देशात नऊ वर्षात झालेल्या सर्व सुधारणा जवळून अनुभवल्या आहेत.
 
या देशाचा एक नागरिक म्हणून मी भारत बदलताना, खूप वेगाने बदलताना पाहिला आहे. एवढेच नाही तर संपूर्ण जग, भारतात गेल्या ९ वर्षांत झालेल्या क्रांतिकारी बदलांनी स्तंभित झाले आहे, तर इतर काही देश भारताच्या पावलांवर पाऊल टाकत आपल्या यशोगाथांचे अनुकरण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे विचार आणि मते, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व महत्त्वाच्या विषयांमध्ये ग्राह्य धरली जातात, त्यांना किंमत आहे, मग तो विषय शांतता आणि सहकार्य असो, परिसंस्थाशास्त्र आणि पर्यावरण असो, वा व्यापार आणि वाणिज्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या जपान, ऑस्ट्रेलिया आणि फिजी दौऱ्यात याची प्रचिती घेतली.
 
एक भारत, श्रेष्ठ भारत
जी-२० ची अध्यक्षीय कारकीर्द आणि या कालावधीत भारत यजमान म्हणून ज्या प्रकारे जी-२० च्या वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करत आहे, अगदी अलीकडेच श्रीनगरमध्ये यशस्वीपणे झालेल्या बैठकीचेच उदाहरण घ्या, हे सर्व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावाचेच तर द्योतक आहेत. श्रीनगरव्यतिरिक्त, लडाख आणि अरुणाचल प्रदेश येथे झालेल्या जी-२० च्या बैठकीदेखील ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे भारताचे तत्वज्ञान अधोरेखित करतात.
 
भारताच्या नऊ वर्षांच्या गतप्रवासातील, मला सर्वाधिक सुखावणाऱ्या उत्साहवर्धक घडामोडी म्हणजे, गरीब आणि मागासवर्गीय, शेतकरी आणि खेडूत, दलित आणि आदिवासी समुदाय, आपल्या महिला आणि युवा वर्ग यांचे सबलीकरण. भारताची महिलाशक्ती जीवनाच्या सर्व क्षेत्रात ठसा उमटवत आहे. नरेंद्र मोदी सरकार, सामाजिक न्याय आणि कल्याणासाठी अत्यंत कटिबद्ध आहे कारण ‘सबका साथ, सबका विकास’ हे सरकारच्या कार्यसंस्कृतीचे मार्गदर्शक तत्त्व आहे.
 
‘डीबीटी’मुळे भ्रष्टाचार थांबला
आज सरकारच्या विविध थेट लाभ हस्तांतर योजनेच्या (डीबीटी) लाभार्थ्यांचे पैसे, कुठलेही मध्यस्थ आणि दलाल यांच्या तावडीत न सापडता, त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट पोचत आहेत. यामुळे सरकारी निधीतून होणारी भ्रष्टाचाररुपी पैशाची गळती थांबली आणि हा वाचलेला पैसा सरकारच्या विविध समाज कल्याण योजना आणि सामाजिक उपक्रमांमध्ये वापरला जात आहे. नऊ वर्षात देशाच्या दरडोई उत्पन्नात, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी सरकारने देशातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडले आहे. प्रत्येक राज्यात औद्योगिक पट्ट्यांसारखे विकासाचे टापू (कॉरिडॉर्स) सुद्धा उभारले जात आहेत.
 
इतिहासातील घोडचुकात सुधारणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाला फक्त आर्थिक वृद्धी आणि विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे नेऊन थांबलेले नाहीत, तर ते इतिहासात घडलेल्या घोडचुका सुद्धा सुधारत आहेत. भव्य दिव्य असे राम मंदिर अयोध्येत उभे राहत आहे, जम्मू काश्मीर मधून ३७० कलम हटवण्यात आले आहे, दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढा पुकारण्यात आला आहे आणि त्रिवार किंवा तोंडी तलाकच्या त्रासातून मुस्लिम महिलांची सुटका करण्यात आली आहे. वसाहतवादी गुलामगिरीची मानसिकता आणि वारसा यांच्या खुणा पुसून टाकण्याचा चंगच सरकारने बांधला आहे आणि गेली नऊ वर्षे त्या दिशेने जोरदार वाटचाल सुरु आहे.
 
रेस कोर्स रोडचे नाव बदलून ते आता लोककल्याण मार्ग ठेवण्यात आले आहे, राजपथ हा आता कर्तव्यपथ झाला आहे, राष्ट्रीय स्मारकाचेही सरते शेवटी राष्ट्रार्पण झाले आहे, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा आता ऐतिहासिक अशा इंडिया गेटची शोभा वाढवत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा, सरदार पटेल यांचा आहे आणि त्यांनी राष्ट्राला दिलेल्या तितक्याच टोलेजंग योगदानाचेच प्रतीक ठरत, तो आता कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत आहे.
 
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त, भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. पुढच्या अमृत काळात प्रवेश करत असतानाही आपण हा अमृत महोत्सवाचा आनंद साजरा करत आहोत. आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही आहोत. मात्र आपल्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेचे कामकाज, ब्रिटिशकालीन संसद भवनातून सुरू होते. इथे लक्षात घेण्याजोगी सर्वात महत्त्वाची बाब अशी की संसद भवनाची ही जुनी वास्तू, संसद भवनासाठी म्हणून बांधलेलीच नव्हती.
 
नव्या संसदभवनाची नितांत गरज खूप वर्षांपासून भासत होती. एक खासदार म्हणून मलाही संसद भवनाची नवी वास्तू असावी अशी गरज वाटत होती. या विषयावर खूप वेळा चर्चा सुद्धा झाली, मात्र हा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यासाठी, कुठल्याही सरकारने पुढाकार घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अत्यंत महत्त्वाचे आव्हान नुसते स्वीकारलेच नाही तर आपल्या नव्या संसद भवनाची वास्तू विक्रमी वेळेमध्ये पूर्ण होईल याची काळजी सुद्धा घेतली.
 
संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला आहे. आपली लोकशाही मूल्ये आणि तत्त्वे यांचे जतन आणि संवर्धन करण्यात यामुळे मोलाचे योगदान मिळणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात आपल्या देशासमोरील अनेक आव्हानांचे रूपांतर सुद्धा संधींमध्ये केले आहे. कोरोना साथ, आर्थिक मंदी आणि रशिया-युक्रेन युद्ध अशा संकटमालिकेतही, भारताच्या मजबूत आर्थिक वृद्धीची यशोगाथा कुठल्याही अडथळ्याविना अखंड सुरुच राहिली.
 
आर्थिक महासत्तांच्या पंक्तीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने अवघ्या नऊ वर्षांत भारताला पहिल्या पाच आर्थिक महासत्तांच्या पंक्तीमध्ये स्थान मिळवून दिले आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातही भारत स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तर आपण संरक्षण सामुग्रीची निर्यातही सुरू केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने आपल्या सीमा सुरक्षित करण्यावर देखील जास्तीत जास्त भर दिला आहे. व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम म्हणजेच सीमेवरील सजग गाव हा या दिशेने राबविलेला एक महत्त्वाचा उपक्रम असून सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
 
मागील सरकारांनी मोठा गाजावाजा करत सुरु केलेले मात्र पूर्ण होऊ न शकलेले अनेक महत्त्वाचे प्रकल्प, गेल्या नऊ वर्षांत पूर्ण झाले आहेत. आधीच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारांनी असे ४०० हून अधिक प्रकल्प सुरू केले होते, परंतु दशकानुदशके ते वेळकाढूपणामुळे रखडले होते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ताबडतोब नरेंद्र मोदी यांनी या रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी विशेष कृतीदलाची स्थापना केली आणि नरेंद्र मोदी सरकारच्या काळात हे सर्व प्रकल्प पूर्ण होताना आपण पाहिले.
 
मी गेली नऊ वर्षे, आशा, आकांक्षा आणि विश्वासाची वर्षे मानतो.गेल्या नऊ वर्षात, प्रगती, पर्यावरण, मानवतावाद आणि समाजकल्याण यांचा विलक्षण अनोखा संगम झाला आहे. या कालखंडाने आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया रचला आहे. आपण आपल्या स्वातंत्र्याचे शतक पूर्ण करत असताना २०४७ पर्यंत, विकसित भारताच्या उद्दिष्टाचा कळस गाठण्यात, हा आज रचलेला पाया उपयुक्त ठरणार आहे. आपल्या देशाच्या सेवेत स्वतःला पुन्हा एकदा झोकून देण्याची आणि भारताला विश्वगुरूच्या उच्चासनावर बसवण्यासाठी शपथ घेण्याची, आज हीच ती योग्य वेळ आहे. कोट्यवधी भारतीयांच्या वीज, घरे, शिधा या सर्व मूलभूत गरजा आणि अधिकार आहेत. मात्र, गेली अनेक दशके यांची प्रतिक्षाच होती. नरेंद्र मोदी सरकार, या गरजा व अधिकारांची प्रतिक्षा संपवून पूर्तता करत आहे.’’
 
उल्लेखनीय कामगिरी
  • ४८ कोटींहून जास्त नागरिकांना बँकिंग सुविधा
  • १८,००० गावे आणि ४ कोटी घरांना वीज
  • तीन कोटींहून जास्त गरिबांना पक्की घरे
  • सुमारे ११ कोटी शौचालय बांधली
  • महिलांना सुमारे ९.५० कोटी गॅसजोडण्या
  • ५५ कोटींहून जास्त भारतीयांना आयुष्मान भारत योजनेचे कवच
  • १० कोटींहून जास्त शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा आधार
  • ८० कोटींहून जास्त गरजूंना मोफत शिधा
(लेखक माजी राष्ट्रपती आहेत)