पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांचा फोन, युक्रेनमधील भूमिकेबद्दल मानले आभार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच, त्यांनी रशिया-युक्रेन संघर्षात भारताने बजावलेल्या भूमिकेबद्दल आणि शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान मोदींचे विशेष आभार मानले.

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण चर्चा झाली. या फोन कॉलनंतर, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी शुल्कावरून (Tariff) निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या चर्चेदरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधांना 'अत्यंत खास' म्हटले आणि पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची आपली मैत्री कायम असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबतच्या तेल व्यापारावरून नाराजी व्यक्त केली होती, मात्र या फोन कॉलनंतर त्यांच्या भूमिकेत नरमाई आल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'X' वरून सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी लिहिले, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार. आमची मैत्री आणि भागीदारी दोन्ही देशांच्या लोकांच्या भल्यासाठी अशीच पुढे जात राहील."

या फोन कॉलमुळे दोन्ही देशांमधील व्यापारी वाटाघाटी पुन्हा सुरू होण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने भारतावर ५०% पर्यंत शुल्क लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, आता या नव्या घडामोडीमुळे दोन्ही देश चर्चेतून तोडगा काढण्यास तयार असल्याचे दिसत आहे.