भारतीय कॅप्टन स्मिथ मच्छार यांचा यूएईच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
विमानावरील हल्ला उधळणाऱ्या भारतीय पायलट स्मिथ मच्छार यांचा यूएईच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव करताना शेख हमदान
विमानावरील हल्ला उधळणाऱ्या भारतीय पायलट स्मिथ मच्छार यांचा यूएईच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव करताना शेख हमदान

 

दुबईहून तेल अवीव कडे जाणाऱ्या विमानावरील मध्य-हवेतील जीवघेणा हल्ला धाडसाने उधळवून लावत १७० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय कॅप्टन स्मिथ मच्छार आणि 'फ्लाईदुबई'च्या क्रू मेंबर्सचा यूएई सरकारने सर्वोच्च सन्मानाने गौरव केला आहे. संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष हिज हायनेस शेखा मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांनी भारतीय कॅप्टन स्मिथ मच्छार आणि सहकाऱ्यांना 'फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ जायद II' (First Class Order of Zayed II) हा उच्चस्तरीय नागरी पुरस्कार प्रदान केला.

दुबईचे क्राउन प्रिन्स, उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री हिज हायनेस शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते एका विशेष अध्यक्षीय सोहळ्यात हे पुरस्कार सुपूर्द करण्यात आले. क्रू मेंबर्सने दाखवलेले अतुलनीय धैर्य आणि जबाबदारीच्या भावनेचे यावेळी त्यांनी विशेष कौतुक केले.

हवेतील भयंकर प्रसंग अन् प्राणांची बाजी
ही थरारक घटना ३० सप्टेंबर रोजी फ्लाईदुबईच्या FZ1073 या विमानामध्ये घडली होती. विमान दुबईहून तेल अवीवकडे जात असताना ओमानच्या नागरिक असलेल्या सह-पायलटने अचानक आपत्कालीन परिस्थितीसाठी कॉकपिटमध्ये ठेवण्यात येणाऱ्या कुऱ्हाडीने (Crash axe) मुख्य पायलट स्मिथ मच्छार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामुळे विमान अवघ्या ३० सेकंदात सुमारे १४,००० फूट खाली कोसळले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी आपल्या उर्वरित ताकदीचा वापर करत कॉकपिटच्या दरवाजाचे लॉक उघडले. यामुळे विमानातील प्रवाशांनी आणि इतर क्रू मेंबर्सनी तातडीने कॉकपिटमध्ये धाव घेऊन त्या सह-पायलटला पकडले आणि त्याच्यावर ताबा मिळवला. त्यानंतर विमानातील दुसऱ्या दोन वैमानिकांनी सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. गंभीर जखमी झालेल्या मच्छार यांच्यावर सुरुवातीला सौदी अरेबियात आणि त्यानंतर अबू धाबी येथे उपचार करण्यात आले.