जागतिक पातळीवरील सद्यस्थिती पाहता गॅस सिलिंडरच्या दरात झालेली वाढ अपरिहार्य आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहे. रविवारी कर्नाटकच्या धारवाड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी दरवाढीबद्दल सरकारलाही खेद असल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी गॅसच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून, सिलिंडर २९ रुपयांनी महागला आहे.
प्रल्हाद जोशी म्हणाले की, "गॅस सिलिंडरच्या दरवाढीबद्दल आम्हालाही दुःख आहे. पण टीका करण्यापूर्वी सर्वांनी संपूर्ण जगातील परिस्थिती समजून घेतली पाहिजे. जग सध्या अत्यंत गंभीर संकटाचा सामना करत आहे." मालवाहतुकीवर (Transshipment) मोठा परिणाम झाला असून, अत्यंत मर्यादित स्रोतांकडून एलपीजी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी खरेदीचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.
सध्या भारतापासून खूप दूर असलेल्या देशांमधून गॅसची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वाहतूक खर्च आणि मूळ किंमत जास्त आहे. मालवाहतुकीला लागणाऱ्या ४० ते ४५ दिवसांच्या कालावधीमुळे विम्याचा खर्चही वाढला आहे. यामुळे सामान्य माणसाची चिंता असली तरी दरवाढ अटळ असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने यापूर्वी ७ मार्च रोजी सिलिंडरमागे ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. इंधनाच्या जागतिक किमतीत मोठी वाढ होऊनही भारतीय ग्राहकांना जगभरात सर्वात कमी दरात घरगुती गॅस उपलब्ध होत असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
एलपीजी दरवाढीचे समर्थन करतानाच जोशी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवरही निशाणा साधला. राज्यातील सरकार भ्रष्टाचार, घराणेशाही आणि गटबाजीने ग्रासले असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पक्षामधील 'अंतर्गत असंतोष' उघड असून, प्रशासनात सर्व काही आलबेल नसल्याची टीका त्यांनी केली.