बंगाल विधानसभा निवडणूक : २९२६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पश्चिम बंगालमधील अत्यंत चुरशीच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) सलग चौथ्यांदा सत्तेत येणार की भाजप (BJP) पहिल्यांदाच सरकार स्थापन करून इतिहास रचणार, हे आज स्पष्ट होणार आहे.

राज्यातील २३ जिल्ह्यांमधील ७७ केंद्रांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत २९४ पैकी २९३ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी सुरू आहे. या प्रक्रियेत एकूण २,९२६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. निवडणूक आयोगाने शेजारील फाल्टा या एका मतदारसंघातील निवडणूक 'गंभीर गुन्हे आणि लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन' झाल्याचा ठपका ठेवत रद्द केली होती. तेथे आता २१ मे रोजी फेरमतदान आणि २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

विक्रमी ९२.४७ टक्के मतदान

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, स्वातंत्र्यानंतर प्रथमच बंगालमध्ये यंदा ९२.४७ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. ही निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली; २३ एप्रिल रोजी १५२ जागांसाठी आणि २९ एप्रिल रोजी १४२ जागांसाठी मतदान झाले. नुकत्याच राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत (SIR) मतदार यादीतून सुमारे ९१ लाख लोकांची नावे वगळण्यात आल्यानंतर एकूण मतदारांची संख्या ६.८२ कोटी इतकी राहिली होती.

प्रक्रियेनुसार, प्रथम निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाची (पोस्टल बॅलेट) मोजणी केली जात आहे आणि त्यानंतर ईव्हीएम (EVM) मधील मते मोजली जात आहेत. मतमोजणीच्या सुरक्षेसाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF) २.५ लाखांहून अधिक जवान आणि राज्य पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने २९१ जागांवर, तर भाजपने सर्व २९४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने २९२ जागांवर आणि डाव्या आघाडीने २४६ जागांवर नशीब आजमावले आहे. २०२१ च्या निवडणुकीत तृणमूलने २१५ तर भाजपने ७७ जागा जिंकल्या होत्या.

राजधानी कोलकात्यामध्ये ११ मतदारसंघांसाठी पाच ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत भवानीपूरमध्ये होत असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे मोठे आव्हान आहे. याशिवाय राज्याचे मंत्री सुजित बोस, फिरहाद हकीम, शशी पांजा आणि भाजपचे नेते दिलीप घोष, रुद्राणील घोष, निशिथ प्रामाणिक यांच्यासारख्या अनेक प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.