रोजचे धावपळीचे जीवन, ऑफिसला जाण्याची गडबड, कामाचा ताण-तणाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शिवाय, यासोबतच चिडचिडेपणा आणि मन उदास होणे, इत्यादी समस्या उद्भवतात. या सर्व गोष्टींमुळे आयुष्यातून आनंद हरवून जातो. मग, अशा परिस्थितीमध्ये मन सतत उदास राहते, चिंता आणि ताण-तणाव वाढतो. काही जण तर हसणे देखील विसरून जातात.
आनंद हा प्रत्येकाच्या आयुष्यात असणे, फार महत्वाचे आहे, जर हा आनंद नसेल तर मग माणसाचे आयुष्य व्यर्थ आहे. जगभरात २० मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय आनंद दिन' म्हणून साजरा केला जातो.
या आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाच्या निमित्ताने आज आपण आनंदी राहण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत. या योगासनांचा नियमितपणे सराव केल्यामुळे मन शांत, चिंतामुक्त आणि आनंदी राहण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात मन आनंदी ठेवणाऱ्या या योगासनांबद्दल.
बालासन
बालासन या योगासनाला चाईल्ड पोझ म्हणून ही ओळखले जाते. या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. शिवाय, आपले शरीर लवचिक बनते. बालासनाचा सराव केल्याने ताण-तणाव, चिंता, निद्रानाश इत्यादी समस्या दूर होतात. मानसिक शांतीसाठी आणि आनंदी राहण्यासाठी हे योगासन अतिशय फायदेशीर आहे.
हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर वज्रासनाच्या स्थितीमध्ये सरळ बसा. त्यानंतर, दीर्घ श्वास घेताना तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर सरळ करा. आता श्वास सोडा आणि खाली वाका. आता तुमच्या दोन्ही हातांचे तळवे आणि डोके जमिनीवर ठेवून एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या हातांची बोटे एकमेकांना जोडून दोन्ही तळहातांच्या मधोमध तुमचे डोके ठेवा. आता तुम्हाला शरीरात ताण जाणवेल. आता पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.
वज्रासन
वज्रासन हे योगासन मानसिक शांतीसाठी आणि मूड सुधारण्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. वज्रासनाचा नियमित सराव केल्याने पोटाच्या समस्या आणि आळस दूर होण्यास मदत होते.
हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर सरळ बसा. आता तुमचे दोन्ही गुडघे वाकवून ताठ बसा. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही हात बाजूला ठेवा आणि दोन्ही पायांच्या टाचांवर तुमचे नितंब ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि सरळ रेषेत पाहा. या स्थितीमध्ये तुम्हाला शरिरात ताण जाणवेल. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.