मुंबई
भारतातील पर्यावरणविषयक उपाय जेव्हा यशस्वी होतात, तेव्हा ते केवळ देशातील लोकांचे जीवन बदलत नाहीत, तर जगभरातील प्रगतीला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते, असे प्रतिपादन ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी मंगळवारी रात्री मुंबईत केले. मुंबईत पार पडलेल्या 'अर्थशॉट प्राइज २०२६' (Earthshot Prize) च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
हवामान बदलावरील सर्वोत्तम उपायांसाठी प्रत्येक १ दशलक्ष पौंड (१ मिलियन पाउंड) बक्षीस असलेल्या या प्रतिष्ठित सोहळ्याला बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. इव्हेंट होस्ट करणारा करण जोहर, क्रिकेट जगताचा महागुरु सचिन तेंडुलकर, अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर आणि ऑस्कर विजेते अभिनेते रामी मालेक यांच्यासह प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. तत्पूर्वी, प्रिन्स विल्यम यांनी ई-रिक्षा चालवत वांद्रे सी-लिंक परिसरात अंतिम फेरीतील स्पर्धकांची भेट घेतली होती.
या सोहळ्यात भारताच्या 'महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी' (Mahindra Last Mile Mobility) कंपनीने ई-रिक्षाच्या माध्यमातून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आणि परवडणारे शाश्वत उपाय शोधल्याबद्दल 'क्लिन अवर एअर' श्रेणीत अर्थशॉट प्राइज २०२६ पटकावला. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुमन मिश्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कारासाठी पाच श्रेणींमध्ये जगभरातून पंधरा पर्यावरणपूरक उपायांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 'रिव्हाइव्ह अवर ओशन्स' श्रेणीत न्यूझीलंडचा 'न्युए ओशन वाइड ट्रस्ट', 'बिल्ड अ वेस्ट-फ्री वर्ल्ड' श्रेणीत फ्रान्सची 'पीएफएएस-फ्री फ्रान्स', 'फिक्स अवर क्लायंट' श्रेणीत डेन्मार्कची 'ऑर्स्टेड' कंपनी आणि 'प्रोटेक्ट अँड रिस्टोअर नेचर' श्रेणीत भूतान देशाची निवड करण्यात आली.
आज आपण हवामान बदलाचे परिणाम अधिक स्पष्टपणे पाहत आहोत, असे सांगत प्रिन्स विल्यम म्हणाले की, येणाऱ्या पिढ्या आपल्याला आपण केलेल्या वचनांवरून नाही, तर आपण त्यांच्यासाठी मागे सोडलेल्या जगावरून न्याय देतील. भारतासारख्या देशात अथक प्रयत्नांनी होणारे बदल संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.