भक्ती चाळक
काश्मीर म्हटलं की डोळ्यांसमोर येतात बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरव्यागार दऱ्या, मोठमोठाली शिकारे आणि सफरचंदांच्या बागा. मात्र हिवाळ्यात इथल्या निसर्गाचं रूप पूर्णपणे बदलतं. रस्त्यांच्या कडेला बर्फ साचलेला दिसतो, पाण्याचे प्रवाह गोठलेल्या असतात, धुक्यात घरं हरवतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी हातात कांगडी (शेकोटीसाठी वापरले जाणारे मातीचे भांडे) घेऊन लोकं फिरताना दिसतात.
हिवाळ्याच्या दिवसात इथल्या लोकांच्या सकाळची सुरुवात मस्त गरमागरम काहवाच्या घोटाने होते. या काळात काश्मीरची जीवनशैलीही थंडीच्या तालावर चालू लागते. भाद्रपद-कार्तिक सरून जसा हिवाळा वाढत जातो, तसे काश्मीरचे रूप एखाद्या सुंदर चित्रासारखे बदलून जाते. काश्मीर खोऱ्याततील पारा उणे अंशात गेल्यावर तिथे सुरू होतो ‘चिल्ला-ए-कलां.’
चिल्ला-ए-कलां म्हणजे काय?
काश्मिरी संस्कृतीत २१ डिसेंबर ते ३१ जानेवारी या ४० दिवसांच्या कालावधीला ‘चिल्ला-ए-कलां’ म्हणजेच कडक हिवाळा सुरु होतो. ‘चिल्ला-ए-कलां’ हा पर्शियन भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ कडाक्याची थंडी असा होतो. हिवाळ्यातील सर्वाधिक थंडी, वारंवार होणारी बर्फवृष्टी आणि गोठवून टाकणारे तापमान यासाठी हा काळ ओळखला जातो.
काश्मीरचा हिवाळा तीन टप्प्यांत विभागला जातो. पहिला आणि सर्वांत कठीण टप्पा म्हणजे चिल्ला-ए-कलां. त्यानंतर २० दिवसांचा ‘चिल्ला-ए-खुर्द’ आणि अखेरीस १० दिवसांचा ‘चिल्ला-ए-बच्चा’ येतो. चिल्ला-ए-कलांमध्ये थंडीचा जोर सर्वाधिक असतो. पुढील टप्प्यांत हळूहळू तापमानात बदल जाणवू लागतो आणि थंडीची तीव्रता कमी होत जाते.
या काळाचा संबंध हिवाळ्यातील सूर्याच्या दक्षिणायनाशी आणि वर्षातील सर्वांत लहान दिवसांशी आहे. दिवस लहान आणि रात्री मोठ्या असल्याने सूर्यप्रकाश कमी मिळतो. हिमालयातून येणारी थंड हवा खोऱ्यात पसरते. काश्मीरची भौगोलिक रचना आणि बर्फाच्छादित परिसर यामुळे थंडीचा परिणाम अधिक जाणवतो. बर्फ सूर्यप्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करतो. परिणामी जमिनीला पुरेशी उष्णता मिळत नाही. चिल्ला-ए-कलांमध्ये बर्फवृष्टीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
हिवाळ्यातील जीवनशैली
हा काळ काश्मिरी माणसाच्या जीवनशैलीची परीक्षा मानला जातो. चिल्ला-ए-कलां सुरू झाला की काश्मीरमधील दैनंदिन आयुष्याचा वेग थोडा मंदावतो. सकाळच्या तीव्र कडाक्यापासून वाचण्यासाठी शाळा आणि सरकारी कार्यालयांच्या वेळा उशिराच्या ठेवल्या जातात.
स्थानिक बाजारपेठांमध्ये ताज्या लुसलुशीत पावांचा आणि नुन चायचा (काश्मीरमधील गुलाबी खारट पारंपारिक पेय) घमघमाट पसरलेला असतो. घरांच्या खिडक्यांची तावदाने प्लास्टिकच्या जाड पुठ्ठ्यांनी बंद केलेले असतात. काश्मिरी घरांमध्ये या काळात बुखारीला विशेष महत्त्व असतं. लाकूड जाळून घर उबदार ठेवण्यासाठी बुखारीचा वापर केला जातो. कुटुंबातील मंडळी तिच्याभोवती बसून गप्पा मारतात. दल लेकवरील हाऊसबाोट्सवर जाडजूड गालिचे आणि रजया टाकून व्यवस्था केली जाते.
काश्मिरी माणसाच्या हिवाळी पेहरावात ‘फेरन’ आणि ‘कांगडी’ यांना खास स्थान आहे. फेरन म्हणजे अंगभर घालायचा सैल, लांब झगा. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण त्याचा वापर करतात. फेरनच्या आत ठेवली जाणारी मातीची छोटी शेगडी म्हणजे कांगडी. त्यात निखारे ठेवून शरीराला ऊब दिली जाते. कडाक्याच्या थंडीत कांगडी हातात घेऊन फिरणारी माणसं हे काश्मीरच्या हिवाळ्यातील नेहमीचं दृश्य आहे.
खाद्यसंस्कृतीची खासियत
काश्मीरच्या हिवाळ्याची चर्चा स्थानिक खाद्यपदार्थांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब देणारे, पोटभर आणि पौष्टिक पदार्थ खाण्याकडे स्थानिकांचा कल असतो. इथल्या खाद्यसंस्कृतीत मसाल्यांचा सुगंध, मंद आचेवर शिजवण्याची पद्धत आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या पाककृतींचा मोठा वाटा आहे.
काश्मीरच्या हिवाळ्यातील एक खास पदार्थ म्हणजे ‘हरिस्सा’. मटण आणि तांदूळ मंद आचेवर बराच वेळ शिजवून त्यात बडीशेप, दालचिनी आणि वेलचीसारखे मसाले घातले जातात. हा पदार्थ सहसा सकाळी तंदुरी ब्रेडसोबत खाल्ला जातो. थंडीच्या दिवसांत हरिस्सासाठी स्थानिक दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळते.
‘शब देग’ हादेखील काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ आहे. मटण, शलजम आणि मसाले एकत्र करून बंद भांड्यात रात्रभर मंद आचेवर शिजवले जातात. त्यातून तयार होणाऱ्या पदार्थाला वेगळीच चव येते. ‘शुफ्ता’ हा सुकामेवा, पनीर, तूप, साखरेचा पाक आणि मसाले वापरून तयार केला जाणारा गोड पदार्थ आहे.
याशिवाय वांगन हाच म्हणजे सुकवलेल्या वांग्यापासून तयार होणारी भाजी, दह्याच्या रस्स्यातील काश्मिरी राजमा आणि वाजवानमधील प्रसिद्ध ‘गुश्ताबा’ हे पदार्थही आवर्जून चाखले जातात. मऊ मटणाचे गोळे आणि दह्याच्या घट्ट रस्स्यात तयार होणारा गुश्ताबा काश्मिरी खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
पर्यटकांसाठी बर्फाच्या दुनियेची सफर
चिल्ला-ए-कलां हा काश्मीरमधील पर्यटनासाठीही महत्त्वाचा काळ आहे. बर्फवृष्टीची प्रतीक्षा करणारे पर्यटक या दिवसांत काश्मीरकडे वळतात. येथील सौंदर्य अनुभवण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात.
गुलमर्ग हे स्कीइंग आणि बर्फावरील खेळांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. गोंडोला केबल कारमधून बर्फाच्छादित पर्वतांचं विहंगम दृश्य पाहता येतं. स्कीइंगची आवड असणाऱ्यांसाठी हा काळ खास असतो. पहलगाममध्ये लिद्दर नदीचा परिसर, बर्फाने झाकलेली कुरणं आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करतं. श्रीनगरमधील डल लेकवर सकाळच्या धुक्यात शिकारा सफर करण्याचा अनुभवही पर्यटकांना घेता येतो.
सोनमर्गमधील थाजीवास ग्लेशियरचा परिसर बर्फाळ निसर्गासाठी ओळखला जातो. मात्र हिवाळ्यात हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार तिथे जाणं शक्य होतं. गुरेझ व्हॅलीमध्ये किशनगंगा नदी, हब्बा खातून पर्वत आणि लाकडी घरांची पारंपरिक रचना पाहायला मिळते. आरू व्हॅली आणि बेताब व्हॅलीमध्येही बर्फाच्छादित पर्वत, निसर्गरम्य कुरणं आणि फोटोग्राफीसाठी सुंदर ठिकाणं आहेत. काही पर्यटनस्थळांवरील वाहतूक आणि प्रवेश हवामानानुसार बदलू शकतो.
थंडीचा कडाका संपल्यानंतर…
काश्मीरमधील चिल्ला-ए-कलां दरवर्षी साधारण २१ डिसेंबरच्या आसपास सुरू होतो. त्यानंतर चिल्ला-ए-खुर्द आणि चिल्ला-ए-बच्चा असे दोन टप्पे येतात. चाळीस दिवसांचा कडाका ओसरल्यानंतरही काही काळ थंडी टिकून राहते. मार्चकडे वाटचाल सुरू झाली की हळूहळू बर्फ वितळू लागतो आणि दऱ्याखोऱ्यांत पुन्हा हिरवाई दिसू लागते.
काश्मिरी लोकांनी थंडीशी जुळवून घेत जपलेली जीवनशैलीही या काळाचं वैशिष्ट्य आहे. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना काश्मीरचं हे रूप कायम लक्षात राहतं.